कोणताही धंदा, व्यवसाय करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला नाही… हा शब्द ऐकायला मिळेल. धंदा करण्यापेक्षा नोकरी बरी असाच सल्ला दिला जातो. मात्र, घरात नोकरीचे वातावरण असतांनाही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील १७ वर्षीय तरुणाने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. ४ कोबड्यांपासून सुरु केलेला हा व्यवसाय आज २०० कोबंड्यावर पोहोचला असून महिन्याला एक ते दीड लाखांचे उत्पन्न यातून मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आर्यन सचिन तेजाळे (वय – 17) हा वास्तव्यास असून त्यांचे वडील सचिन तेजाळे हे नाशिक येथेच शासकीय नोकरीस आहेत. आर्यन याचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. आर्यन याने परिक्षा दिल्यानंतर काही दिवसातच कोरोना माहामारीमुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे तो व त्याचे कुटूंबिय त्यांच्या फार्मवर स्थलांतरित झाले. मात्र हे स्थलांतरण आर्यनच्या जिवनात एक वळण घेवून आले. याठिकाणी त्यांनी चार गावठी कोंबड्या पाळल्या होत्या. त्या कोंबड्या पाहून आर्यनला गावठी कोंबड्यांचे पालन करण्याची कल्पना सुचली आणि त्याने अंमलात देखील आणली. २०२१ ला त्याने १० गुंठे जागेवर मंदाकीनी ॲग्रो फार्मची मुहूर्तमेढ रोवली. आज त्याचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत आहे. याविषयी बोलतांना तो सांगतो की, कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी सोनाली, कावेरी या देखील प्रजाती आहेत. परंतु गावठी कोंबडी ही परंपरागत चालत आलेली जात आहे. त्यामुळे गावठी कोंबडी पालन करण्याचा निर्णय घेतल्याचे तो सांगतो.
200 वर कोंबड्या
आर्यन याने ४ कोंबड्या आणि १ कोंबडा अशा पाच पक्षांवर सुरु केलेला व्यवसाय आज २०० कोंबड्या, २५ कोंबडे आणि १२०० शेच्या जवळपास पिल्लांवर पोहोचला आहे. या कोंबड्यापासून दररोज ३० ते ४५ अंडी प्राप्त होतात. मात्र, या अंड्यांची विक्री न करता तो या अंड्यांचा वापर त्याचा फार्ममधील पक्षांची संख्या वाढविण्यासाठी करतो. यामुळे याला त्याच्या फार्ममधील पक्षी वाढण्यासाठी बाहेरुन पक्षी खरेदी करण्याची गरज भासत नाही. फार्ममधीलच कोंबड्यांना अंड्यावर बसवून तो व्यवसायात वाढ करीत आहे.
नैसर्गिक खाद्याचा वापर
आर्यन हा कोंबड्यांना कंपन्यांमध्ये तयार केलेले खाद्य खाऊ न घालता अन्न, धान्य, भाजीपाला, माशांचे अवशेष यांचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करतो. आर्यन याविषयी बोलतांना सांगतो की, माशांमध्ये नैसर्गिकरित्या मोठ्याप्रमाणात कॅल्शीयम असते. त्यामुळे त्यांची अंडी देण्याची क्षमता देखील वाढते. बाहेरील कॅल्शीयम दिल्याने त्यांची कॅल्शीयमची गरज तर भागते परंतु बाकी कोणता फायदा होत नाही. त्यामुळे मच्छी मार्केटमधून कापलेल्या माशांचे तुकडे आणून कोंबड्यांना खायला टाकत असल्याचेही तो सांगतो. याचबरोबर हॉटेलमधून वाया जाणारे अन्न, भाजीपाला विक्रेत्यांनी फेकून दिलेला भाजीपाल्याचा देखील कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापर करतो. यातून कोंबड्यांना आवश्यक असलेले पौष्टीक घटक मिळून उर्वरित गरज मका भरड, ज्वारी, गहू, तांदूळ यांसारख्या धान्यातून भागविली जाते. यामुळे खाद्यावर होणारा खर्च देखील वाचत असल्याचे तो सांगतो.
थोडक्यात महत्त्वाचे
वडील शासकीय नोकरीस आणि आर्यन तेजाळे याने सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय
व्यवसायाच्या सुरुवातीलाच दिडशे पिल्लांचा मृत्यू
कमी खर्चात उभारला व्यवसाय
अंडी घालणे, पिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
महिन्याला दीड लाखांचे उत्पन्न
शेतकऱ्यांनाही रोजगार
आर्यन याने मंदाकिनी ॲग्रो फार्मच्या माध्यमातून शेतकरी तसेच कुक्कुटपालन करु इच्छिणाऱ्यांसाठी अनोख्या पद्धतीने उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. याविषयी बोलतांना तो सांगतो की, माझ्या फार्ममध्ये तयार झालेले लहान पिले शेतकऱ्यांशी करार करून त्यांना दिले जातात. ती पिले मोठी झाल्यावर मिच त्यांच्याकडून जास्तीचा दर देवू खरेदी करतो. यातून त्यांना देखील उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे.
महिन्याला दीड लाखांचे उत्पन्न
गावराण कोंबडीसह तिच्या चिकनलाही मोठी मागणी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची विक्री होवून त्याच्यामाध्यमातून महिन्याला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे आर्यन सांगतो.