देशभरातील हवामानाचे चक्र पुन्हा एकदा बदलले आहे. दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस बरसत आहे. तमिळनाडूत भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे उर्वरित देश गारठ्याने कुडकुडला आहे. पुढे काय स्थिती राहील आणि राज्यातील हवामान कसे असेल, ते आपण जाणून घेऊया.
सध्या दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ चक्रीवादळ निर्माण झालेले आहे. विषुववृत्तीय हिंदी महासागर तसेच शेजारील बंगालच्या उपसागरावर नैऋत्येकडे हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. आता ते कोमोरिन आणि शेजारच्या क्षेत्रात आहे. त्यामुळेच दक्षिण तामिळनाडूमध्ये पाऊस बरसत आहे.
1871 नंतर सर्वाधिक पावसाची नोंद
तमिळनाडूतील 2 शहरात एकाच दिवसात वर्षभर पडणारा पाऊस बरसला आहे. या ठिकाणी बरसलेल्या 670 ते 932 मिमी पावासाने 152 वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. इतर बऱ्याच ठिकाणी 1871 नंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यातील 40 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफच्या जोडीला लष्कर, नौदल आणि इतर आपत्कालीन पथक या भागात बचाव कार्यास मदत करत आहेत.
आठवडाभर पावसाचा तडाखा कायम
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दक्षिण तामिळनाडूमध्ये मंगळवारी अतिवृष्टी झाल्याचे म्हटले आहे. पावसाने तडाखा दिलेल्या थूथुकुडी, तिरुनेलवेली या दोन्ही जिल्ह्यांसह तेनकासी आणि कन्याकुमारी जिल्ह्यात आज, बुधवारी आयएमडीने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण भारतात पुढील आठवडाभर पावसाचा तडाखा कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तमिळनाडूसह केरळ, पुडुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार बेटांवर बुधवारपासून शनिवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
उत्तरेकडील पहाडी भागात बर्फवृष्टीमुळे थंड वारे
सध्या भारताच्या उत्तरेकडील पहाडी प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून मुळे थंड वारे वाहत असल्याने देशात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीसह लगतचा भाग (एनसीआर) तसेच उत्तर भारतातही अनेक शहरात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. आगामी 4-5 दिवस पंजाब-हरियाणात दाट धुके राहण्याचा अंदाज आहे. त्रिपुरा, मेघालय आणि बिहारमध्येही हलक्या-मध्यम धुक्याची चादर राहू शकते. सध्या पंजाब-हरियाणात अनुक्रमे 5 आणि 6 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरलेला आहे. दिल्लीतही किमान तापमानाने 6 अंशांची पातळी गाठली आहे.
येत्या काही दिवसात महाराष्ट्रात काय राहील परिस्थिती?
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या 2-3 दिवसांत वायव्य भारतासह मध्य भारतातील तापमानाचा पारा खालावणार आहे. महाराष्ट्रातही किमान तापमान घटण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा राज्यात सध्या कोरडे हवामान राहणार असले तरी काही भागात हाडे गोठवणारी थंडी जाणवेल. दुसरीकडे, 3-4 दिवसात आंध्र प्रदेश किनारपट्टीसह रायलसीमा भागात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता आहे. आंध्रालगतच्या महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस होऊ शकतो.