संसाराची जबाबदारी सांभाळून भाग्यश्रीताई पाटील यांनी शेतीसारख्या जोखिमीच्या क्षेत्राला नवे वळण दिले. अभ्यासू वृत्ती, अखंड कष्ट अन् इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऊती संवर्धित रोपांची निर्मिती करणारी मराईज एन शाईन बायोटेकफ ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या कार्यकक्षा आता जगाच्या पाठीवरील 27 देशांपर्यंत विस्तारल्या आहेत. उलाढालही लवकरच तीन आकडी कोटींचा पल्ला गाठणार आहे. शेती क्षेत्रात काहीतरी करू इच्छिणार्यांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. हात आभाळाला भिडलेले असताना पाय मात्र जमिनीवरच असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजेच भाग्यश्रीताई…
पुणे जिल्ह्यातील थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणपतीचे देवस्थान. याच थेऊरला राईज एन शाईन बायोटेक कंपनीची गणेशवाडीत भागात भाग्यश्री पाटील यांनी 2003 मध्ये मुहूर्तमेढ रोवली. कंपनीच्या संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या काम पाहत आहेत. ऊती संवर्धनातून (टिश्यू कल्चर) निर्मित होणार्या विविध फळे, फुलांच्या वनस्पतींसाठी ही कंपनी सातासमुद्रापार प्रसिद्ध झाली आहे. कंपनीत त्यांच्यासह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध फळझाडांची आणि फुलझाडांची सुमारे तीन कोटींहून अधिक दर्जेदार रोपे तयार होतात. त्यातील 50 टक्के रोपे भारतात तर उर्वरित 50 टक्के रोपे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकली जातात. अनुभवातून शिकत त्यांनी पुढे पाऊले टाकली. आवड आणि अभ्यासाला कष्टाची जोड देत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतीतही खूप काही वेगळे करू शकतो, हा विश्वास त्यांनी शेतकर्यांना दिला आहे. जगभरातील शेतीचा अभ्यास करून त्यांनी केळी आणि फुलशेतीचे नवे तंत्रज्ञान विकसित केले. कार्नेशन, जरबेरा, ऑर्किड यासारख्या फुलांसाठी त्यांनी अत्याधुनिक टिश्यू कल्चर तंत्रज्ञान आणले. जगभरात विस्तारलेल्या फुलशेतीचे जाळे या माध्यमातून भारतात उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्याकडील वातावरणात सहज येतील; अशा जाती शोधल्या. त्यावर संशोधन करून त्यांनी शेतकर्यांना उत्तम दर्जाची रोपे उपलब्ध करून दिली. एक महिला म्हणून त्यांची आजवरची वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शेतीत काहीतरी नवे करू इच्छिणार्यांसाठी त्यांनी आदर्श घालून दिला आहे.
कोल्हापुरात गेले बालपण
भाग्यश्री पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1961 रोजी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शेतकरी कुटुंबात झाला. आई शांतादेवी पाटील, वडील डॉ. डी.वाय. पाटील, मोठे भाऊ संजय पाटील, लहान भाऊ माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, मोठी बहीण सुप्रिया पाटील, लहान बहीण राजश्री कापडे यांच्यासह त्यांचे बालपण याच ठिकाणी गेले. त्यांचे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यांच्या वडिलांकडे 25 एकर शेती होती. मात्र, वडील समाजकारण व राजकारणात सक्रिय असल्याने त्यांना शेतीकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नसे. त्यामुळे त्यांच्या आईवर शेतीची प्रमुख जबाबदारी होती. आईसोबत त्या नेहमी शेतात जात. शेतीची छोटी-मोठी कामेही करत. आज वडील डॉ.डी.वाय. पाटील यांचे नाव खूप मोठे असले तरी त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरवातीचा काळ खूप कष्टाचा होता. आईने खूप कष्ट घेतले आहेत. त्यांचे कष्ट पाहूनच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. या गोष्टीमुळे बालपणापासूनच शेतीशी नाळ जुडल्याने त्यांना शेतकर्यांविषयी आत्मियता आहे. म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन शेती आणि शेतकर्यांसाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्णय घेत तो प्रत्यक्षात कृतीत आणला. राईज एन शाईन बायोटेक कंपनीच्या माध्यमातून शेती विकासासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
थेऊरला शेतीचा श्रीगणेशा
बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 मध्ये त्यांचे डॉ. प्रसाद दत्तात्रय पाटील यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर त्या पुण्यातील दापोडीत आल्या. त्यांचे सासरे डॉ. दत्तात्रय तुकाराम पाटील हे राज्यातील पहिले इंजिनिअर होते. पती डॉ. प्रसाद हे बजाज ऑटोत नोकरीला होते. या काळात पैसा मिळवण्यासाठी काय करता येईल, याचा त्या विचार करत होत्या. बालपणापासून शेतीविषयी जिव्हाळा असल्याने त्यांना शेतीक्षेत्र खुणावत होते. लग्नानंतरही शेतात काम करण्याची आवड कायम असल्याने 1996 मध्ये त्यांच्या पतींनी थेऊरला त्यांच्यासाठी दोन एकर शेती घेतली. पिंपरीत राहत असताना त्या प्रत्येक संकष्टीला बसने गणपतीच्या दर्शनासाठी थेऊरला यायच्या. ही शेती विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने मिळाल्याची त्यांची भावना आहे. या शेतीत त्यांनी सुरवातीला भाजीपाला व नंतर टिश्यू कल्चर केळीची लागवड केली. ही रोपे आणण्यासाठी त्यांना खूप शोधाशोध करावी लागली. भरघोस उत्पादनासाठी उच्च दर्जाची व निरोगी रोपे सहज उपलब्ध झाली पाहिजेत, ही त्यांच्या लक्षात आली. आपल्याला यात काय करता येईल, या विचारातून त्यांनी पुढे पाऊल टाकले.
अभ्यासातून कंपनीची स्थापना
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती कशी केली जाते, याचा अभ्यास करण्यासाठी त्या देशासह विदेशात फिरल्या. शेतीतले नवनवे प्रयोग त्यांनी पाहिले. या प्रवासात त्यांना फ्लोरीकल्चरचे विशेष आकर्षण वाटले. बायोटेकमध्ये काम करण्यास वाव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःची कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला. यातूनच राईज एन शाईन बायोटेक कंपनी उदयास आली. डिसेंबर 2003 मध्ये त्यांनी थेऊरला 4 हजार चौरस फूट क्षेत्रावर पहिली प्रयोगशाळा उभारली. पहिल्या वर्षी या प्रयोगशाळेत टिश्यू कल्चर केळीच्या 60 हजार रोपांची बॅच होती. मात्र, तंत्रज्ञानाचा फारसा अनुभव नसल्याने त्यातील 60 टक्के रोपे खराब झाली. तरीही त्या खचल्या नाहीत, दुसर्या वर्षी त्यांनी थेट इस्त्राईलहून चांगल्या दर्जाचे केळीचे कंद आणून त्यावर संशोधन करत नवी रोपे विकसित केली. ही रोपे स्वतःसह इतर शेतकर्यांच्या शेतात लावून ती दर्जेदार असल्याचे सिद्ध केले. त्यातूनच देशासह परदेशातून त्यांच्या रोपांना मागणी वाढली. आज त्यांच्या कंपनीत दरवर्षी तयार होणारी सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक रोपे युगांडा, मोरोक्को, केनिया, इथिओपिया, हॉलंड, यूएसए, नेदरलँड, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, कॅनडा, कोलंबिया अशा देशांमध्ये निर्यात होतात.
…तरीही चिकाटी सोडली नाही
टिश्यू कल्चर केळी रोपांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्या फ्लोरीकल्चरकडे वळाल्या. आपल्याकडील वातावरणात कोणत्या प्रकारच्या परदेशी फुलांची शेती होऊ शकते, याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातूनच जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, लिली अशा विविध फुलझाडांच्या अनेक जातींची रोपे टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे पॉलीहाऊसेसमध्ये तयार केली. फ्लोरीकल्चरमध्ये काम सुरू झाल्यावर त्यांनी कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेण्यासाठी जगातील विख्यात कंपन्यांसोबत सहकार्य करार करण्याचा निर्णय घेतला. हॉलंड येथील टेरानेग्रा या नामांकित कंपनीच्या मालक राईज एन शाईन मध्ये भेटीसाठी आले होते. त्यांनी येथील प्रयोगशाळाही पाहिली. परंतु, भारतीय लोक कामात सातत्य ठेवत नसल्याचे सांगत त्यांनी सहकार्य करार करण्यास असहमती दर्शवली. मात्र, तरीही भाग्यश्री पाटील यांनी चिकाटी न सोडता कामात सातत्य ठेवले. म्हणूनच 3 वर्षांनंतर टेरानेग्रा कंपनीने सहकार्य करार करण्यास स्वतःहून हात पुढे केला. टेरानेग्रानंतर हॉलंडमधील ड्युमेन ऑरेंज या जगप्रसिद्ध संघटनेसह विविध देशांमधील 9 आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत आता राईज एन शाईन बायोटेकचे सहकार्य करार झाले आहेत. नुसते करारच झाले नाहीत, तर या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्याकडील 30 वर्षांतील तंत्रज्ञानाचे एकमेकांसोबत आदान-प्रदान केले आहे. जगातील 27 देशांमध्ये आपल्या कंपनीची रोपे निर्यात होत असल्याचा मनस्वी आनंद आहे, असे त्या म्हणाल्या.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध
कंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो स्थानिक महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कंपनीची सुरवात होण्यापूर्वी त्यांनी 2 एकर शेती करण्यास सुरवात केली होती. तेव्हा शेती कामासाठी महिला मिळत नव्हत्या. थेऊर, यवत, उरुळी कांचन येथून त्या महिला मजूर आणत होत्या. पुढे कंपनीची स्थापना झाल्यावर स्थानिक महिलांना नवे तंत्रज्ञान शिकवले. त्यामुळे आज ग्रामीण भागातील महिला एखाद्या तज्ज्ञालाही लाजवतील असे काम करत आहेत. म्हणूनच 2 एकरातील शेती 250 एकरापर्यंत वाढवणे त्यांना शक्य झाले. 50 कर्मचार्यांपासून सुरू झालेल्या कंपनीत आज 900 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. त्यात 95 टक्के महिला कर्मचारी असून ही संख्या 700 च्या घरात आहे. कंपनी सुरू झाली तेव्हा आर्थिक उलाढाल 60 लाख होती. आता ती विस्तारून 80 ते 85 कोटी रुपयांच्या घरात आहे. निसर्गावरील प्रेम आणि महिला सक्षमीकरण, हा संस्थेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
अद्यावत प्रयोगशाळांची उभारणी
आजवरच्या प्रवासात त्यांना पती डॉ. प्रसाद पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे. कंपनीची पहिली प्रयोगशाळा उभारण्यासाठी पतीनी त्यांना खूप मदत केली. नंतर मात्र, त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. दुसरी, तिसरी व चौथी प्रयोगशाळा त्यांनी स्वतःच्या जोरावर उभारली. आयएसओ 9001-2008 प्रमाणित असलेल्या त्यांच्या कंपनीकडे आज 1 लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळ असणारी प्रयोगशाळा असून वर्षाकाठी 3 कोटींहून अधिक टिश्यू कल्चर रोपे तयार करण्याची तिची क्षमता आहे. या प्रयोगशाळेजवळच 5 हजार चौरस फूट क्षेत्रफळावर कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग आहे. त्यात तज्ज्ञांची टीम रात्रंदिवस काम करते. 50 हजार चौरस फुटाचे ग्रीन हाऊसही कंपनीकडे आहे. कंपनीचा प्रत्येक विभाग गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असतो. म्हणूनच कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.
गुणवत्तापूर्ण उत्पादनाकडे लक्ष
कितीही संकटे किंवा अडचणी आल्या तरी त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेत कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच कंपनीची घोडदौड सुरू आहे. कृषी क्षेत्रातील कंपन्यांसमोर हवामानाचे मोठे आव्हान असते. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी योग्य निर्णय घेत कंपनीवर परिणाम होऊ दिला नाही. बदलत्या हवामानात तग धरू शकतील, अशी रोपे तयार करण्यासाठी त्यांनी खास संशोधन केले. हीच कंपनीसाठी जमेची बाजू राहिली. विशेष म्हणजे शेतकर्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. त्यांना चांगली सेवा दिली. कंपनीच्या सर्व कर्मचार्यांनाही त्यांनी हाच मंत्र शिकवला. आम्ही तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन काम करतो, असे त्या म्हणतात.
स्नुषांनी सांभाळली जबाबदारी
भाग्यश्री पाटील यांना सोमनाथ पाटील (मोठा) व डॉ. यशराज पाटील (लहान) ही दोन मुले आहेत. सोमनाथ यांच्या पत्नी धनश्री व डॉ. यशराज यांच्या पत्नी यशश्री या आता कंपनीचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी त्यांना मदत करतात. स्मिता जाधव या त्यांच्या कन्या असून त्या सासरी कोल्हापूरला राहतात. तसेच राजवीर, तेजराज, श्रीविद्या, दिग्विजय व देवेंद्र ही नातवंडे आहेत. पहाटे चारला उठल्यानंतर सायंकाळपर्यंत अखंड काम असा त्यांचा दिनक्रम असतो. सायंकाळनंतर मात्र, त्या कुटुंबासाठी पूर्ण वेळ देतात. हे करताना तारेवरची कसरत होते. पण पर्याय नसतो, असेही त्यांनी सांगितले.
समाधानी शेतकरी, हीच कामाची पावती
राईज एन शाईन बायोटेक उभी राहिल्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे माझे स्वप्न होते. गुणवत्तापूर्ण रोपांच्या निर्मितीमुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 9 पेक्षा अधिक कंपन्या आपल्यासोबत सहकार्य करार करून कामासाठी एकत्र आल्या. हा माझ्या आयुष्याला वळण देणारा प्रसंग आहे. कंपनीतर्फे सेवा पुरवत असताना मी अनेकदा शेतकर्यांपर्यंत पोहचते. तेव्हा आपल्या उत्पादनामुळे शेतीत झालेला बदल पाहून मनस्वी आनंद होतो. शेतकर्यांच्या चेहर्यावरील समाधान, हीच चांगल्या कामाची पावती आहे, असे भाग्यश्री पाटील म्हणाल्या.