Home बाजार भाव गुढीपाडव्याला लागणारे हार-कंगण, साखरगाठीचे भाव यंदा तेजीत

गुढीपाडव्याला लागणारे हार-कंगण, साखरगाठीचे भाव यंदा तेजीत

कमी मागणी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळं यंदा साखरगाठी म्हणजेच हार-कंगणाचे भाव यंदा तेजीत आहेत. चैत्र प्रतिपदा, गुढी पाडव्यासाठी साखरगाठींना विशेष मान असतो.

राज्याच्या बहुतांश शहरात अनेक वर्षांपासून भोई समाजातील  कुटुंब पारंपरिकरित्या हा साखरगाठींचा व्यवसाय  करतात. मात्र, यंदा साखरगाठींची मागणी निम्म्यानं कमी झाली असून उत्पादनही कमी आहे. त्यातच दुष्काळजन्य स्थिती आणि वाढत्या तापमानामुळं सणातील गोडवा कमी झाला आहे.

राज्यात बीडमध्ये साखरगाठी तयार करणारे 30हून अधिक  कारखाने आहेत. या साखरगाठींच्या कारखान्यात साधारण एक महिना आधीपासून भट्टी पेटते. दरवर्षी एका कारखान्यातून दररोज तीन ते चार क्विंटल उत्पादन केलं जातं. एकट्या बीडमधून एकूण  एक ते दीड टन साखरगाठींचं उत्पादन केलं जातं. त्यात साखर हाच मुख्य घटक असतो. याशिवाय,  इंधन, मजुरी, दूध, दोरा, लिंबू असा साहित्यावरील खर्च धरता उत्पादन मूल्य 60 ते 65 रुपयांच्या घरात जातं.

यंदा किरकोळ बाजारात साधारण साखरगाठींचा भाव 80 रुपये किलो आहे, तर शुभ्र साखरगाठींचा भाव 100 रुपये आहे. यंदा ग्रामीण भागात पाणीटंचाई आहे, त्याताच शेतमालाला पुरेसा भाव नसल्यानं बाजारात पैसा फिरत नाहीये. त्यामुळं होळीलाही साखरहारांची मागणी अत्यंत कमी होती.