Gram Crop Sowing… हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या बाबींचा विचार केला तर हरभरा लागवडीस व उत्पादनास तसेच महाराष्ट्रात मोठा वाव आहे. अलीकडे पर्यावरणातील वाढता असमतोलपणा, कीड व रोगांचा वाढता प्रभाव, अशा बाबींमुळे भारतातील प्रति हेक्टरी हरभरा पिकाची उत्पादकता मात्र कमी आहे. आज आपण हरभरा पेरणीच्या पद्धती आणि फायदे जाणून घेवू या.
बीबीएफ प्लँटरद्वारे हरभरा पेरणी (Gram Crop Sowing)
सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बीबीएफ प्लँटर हरभऱ्याच्या पेरणीसाठी सुद्धा वापरता येते. याद्वारे पेरणी करतानाच प्रत्येक ४ ओळींनंतर दोन्ही बाजूंना सऱ्या पाडल्या जातात. त्यामुळे तुषार संचाद्वारे तसेच सरीद्वारे सुद्धा पाणी देणे सोईचे होते. रब्बी हंगामात येणाऱ्या अवकाळी पावसामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळता येते. यामध्ये प्रत्येक पाचवी ओळ खाली राखल्यामुळे बियाणे कमी लागते. त्यामुळे बियाणे खर्च, रासायनिक खतांवरील खर्चातही बचत होते. सोबतच हवा खेळती राहिल्यामुळे पीक संरक्षणावरील खर्चात २० टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
सहा अथवा सात ओळी पट्टापेर पद्धतीने पेरणी
सोयाबीन पिकाप्रमाणेच पट्टापेर पद्धती हरभऱ्यातही उपयुक्त सिद्ध होत आहे. हरभरा पेरणीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र सहा दात्यांचे असते. अशा प्रकारे ट्रॅक्टरने पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना सातवी ओळ खाली ठेवावी. याद्वारे शेतात सहा – सहा ओळींच्या पट्ट्यात पेरणी होते. यात प्रत्येक सातवी ओळ खाली राखली जाते.
चार ओळी पट्टापेर पद्धत
ज्या शेतकऱ्यांकडे बीबीएफ पेरणी यंत्र नाही, अशा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचलित सहा दात्यांच्या पेरणी यंत्रातील बियाणे व खताच्या कप्प्यातील दोन्ही काठांवरील प्रत्येकी एक छिद्र बोळा लावून बंद करावे. यामुळे पेरणीवेळी आपोआपच काठावरील ओळी खाली राहतील. पेरणी करताना प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना खाली ठेवलेल्या शेवटच्या ओळीतच पेरणी यंत्राचे शेवटचे दाते ठेवावे. म्हणजे आपोआपच प्रत्येक चार ओळींनंतर पाचवी ओळ खाली राखली जाते. त्या ठिकाणी हलकी सरी तयार होते. बीबीएफ पेरणी यंत्राप्रमाणेच शेतात पेरणी शक्य होते. या पद्धतीतही बियाणे, रासायनिक खते यात २० टक्के बचत होते.
ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्र
शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्र उपलब्ध असल्यास, त्याच्या साह्यानेही सात अथवा सहा अथवा पाच ओळींच्या पट्ट्यामध्ये हरभरा पिकाची पेरणी करणे सहज शक्य होते.
अ) सात ओळींचा पट्टा ठेवायचा असल्यास पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना दोन ओळींतील राखावयाच्या अंतरानुसार एक ओळ सुटेल एवढी जागा खाली सोडावी. त्यामुळे प्रत्येक आठवी ओळ खाली राहील. सात ओळींच्या पट्ट्यामध्ये हरभरा पिकाची पेरणी शक्य होईल.
ब) हरभरा पिकाची पाच ओळींच्या पट्ट्यामध्ये पेरणी करावयाची झाल्यास, सात दाती पेरणी यंत्राचे पहिले व शेवटचे बियाण्याचे व खताचे छिद्र बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या शेवटच्या काकरात ठेवावे. याद्वारे शेतात पाच ओळीच्या पट्ट्यामध्ये पेरणी शक्य होते. प्रत्येक सहावी ओळ खाली राहते.
क) सात दाती पेरणी यंत्राने सहा ओळींचा पट्टा राखावयाचा झाल्यास ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचे बियाण्याच्या कप्प्यातील व यासोबतच खताच्या कप्प्यातील मधले म्हणजेच चार नंबरचे छिद्र बोळ्याने बंद करावे. पेरणी करताना प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे पेरणी करावी. या द्वारे शेतात सहा ओळींच्या पट्ट्यामध्ये पेरणी शक्य होऊन प्रत्येक सातवी ओळ खाली राहील.
मजुरांद्वारे टोकण पद्धतीने जोड ओळ पद्धत
हरभरा पिकाची टोकण पद्धतीने पेरणी करताना जोड ओळ पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात दीड पटीने हमखास वाढ शक्य होते. त्यासाठी खालीलपैकी एक पद्धत वापरता येते.
अ) बैलजोडीचलित अथवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राच्या साह्याने संपूर्ण शेतात केवळ सऱ्या पाडून घ्याव्यात. यानंतर मजुरांद्वारे अथवा नावीन्यपूर्ण मानवचलित टोकण यंत्राने हरभरा पिकाची पेरणी करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी. खाली ठेवलेल्या तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी पिकाची उगवण झाल्यानंतर कोळप्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजेच जोड ओळीतील हरभऱ्याचे पीक गादी वाफ्यावर येईल. मजुरांद्वारे टोकन पद्धतीने बियाणे लावताना दोन झाडातील अंतर १० ते १५ सें.मी. या प्रमाणे प्रत्येक ठिकाणी १ किंवा २ बियाणे लावावेत.
ब) टोकन पद्धतीने जोडओळ पद्धतीचा अवलंब करावयाचा झाल्यास शेत पेरणीसाठी तयार केल्यानंतर छोट्या नांगराच्या साह्याने अथवा बेडकर अथवा तत्सम अवजाराने प्रत्येक तीन ते साडेतीन फुटांवर सऱ्या पाडून घ्याव्यात. म्हणजेच शेतात गादीवाफे तयार होतील. या गादीवाफ्यांवर जोडओळीमध्ये हरभरा पिकाची टोकण पद्धतीने मजुरांद्वारे पेरणी करावी.
जोड ओळीमध्ये अशा प्रकारे गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने मजुरांद्वारे पेरणी करताना दोन ओळींतील अंतर एक ते दीड फूट तसेच दोन झाडातील अंतर नेहमी प्रमाणे १० ते १५ सेंमी यानुसार हरभरा पिकाची पेरणी करावी. एका ठिकाणी १ किंवा २ बिया लावाव्यात. यासाठी मानवचलित नावीन्यपूर्ण सुधारित टोकण यंत्राचा वापरही करता येईल.
क) ठिबक सिंचन पद्धतीने दोन लॅटरलमधील अंतरानुसार लॅटरलच्या दोन्ही बाजीने अर्धा ते पाऊण फूट अंतरावर, दोन झाडांतील राखावयाच्या १० ते १५ से.मी अंतरानुसार हरभरा बियाण्याची टोकन पद्धतीने पेरणी केल्यास जोड ओळ पद्धतीचे स्वरूप देता येईल.
ड) ट्रॅक्टरचलित सहा अथवा सात दाती यंत्राने जोडओळ पद्धतीने पेरणी :
ट्रॅक्टरचलित सहा दाती पेरणी यंत्राने हरभरा पिकाची जोड ओळीत पेरणी झाल्यास पेरणी यंत्रातील बियाण्याचे व खताचे क्र.२ व क्र. ५ छिद्र बंद करावे. आणि प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना नेहमीप्रमाणे पेरणी करावी. याद्वारे जोडओळीत हरभरा पिकाची पेरणी शक्य होते.
इ) ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्राने हरभर पिकाची जोड ओळीत पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्रातील बियाण्याचे व खताचे क्र. १, ४ व ७ चे छिद्र बंद करावे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना पेरणीयंत्राचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या शेवटच्या काकरात ठेवावे. अशा पद्धतीनेही जोडओळीमध्ये हरभरा पिकाची पेरणी शक्य होते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇