तरुण शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतीत किंवा पूरक उद्योगात काहीतरी करू इच्छित असाल तर आजिबात वेळ न दवडता आजच डेअरी उद्योगाला लागा; भविष्यात अमर्याद संधी दार ठोठावणार आहेत. हे कुणा ऐऱ्या- गैऱ्याचे सांगणे नाही. हे भाकीत वर्तविले आहे जागतिक दर्जाचे भाष्यकार डेव्हिड फिकलिंग यांनी, तेही जगातील नंबर 1 माध्यम असलेल्या “ब्लूमबर्ग”मध्ये! जगात लवकरच दुग्धजन्य दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचा त्यांचा दावा आहे. 2030 पर्यंतच जगात दुधाची तूट 30 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. डेव्हिड फिकलिंग हे ब्लूमबर्ग ओपिनियनचे नामांकित स्तंभलेखक आहेत, जे हवामान बदल आणि ऊर्जा यावर भाष्य करतात. यापूर्वी त्यांनी ब्लूमबर्ग न्यूज, वॉल स्ट्रीट जर्नल आणि फायनान्शियल टाईम्ससाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ माजली आहे.
आगामी दशकात मागणीत होणार मोठी वाढ
डेव्हिड फिकलिंग सांगतात, दूध हे जागतिक प्रत्येक बाळाचे पहिले अन्न असते आणि अनेकांना ते पुरेसे मिळत नाही. जगात दरवर्षी जवळजवळ एक अब्ज मेट्रिक टन दूध उत्पादन होते. जगभरात जितके गहू किंवा तांदूळ पिकवला जातो, त्यापेक्षा हे जास्त आहे. मात्र, येत्या दशकात त्याच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दुग्धजन्य पदार्थांचा वापर इतर कोणत्याही कृषी उत्पादनांपेक्षा वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एकीकडे भरमसाठ वेगाने लोकसंख्या वाढत असताना ही दुधाची वाढती गरज भागवायची कशी, याबाबत जगभरातील तज्ञ चिंतेत आहेत. शिवाय, यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.”
समृद्ध पोषक आहारासाठी दुग्धजन्य पदार्थांची शिफारस
दुधाच्या जागतिक मागणीचा विचार करता, विकसनशील देशांमध्ये चार वर्षांपेक्षा कमी वयाचे अर्ध्या अब्जाहून अधिक लोक आहेत, त्यापैकी सुमारे एक तृतीयांश लोक वाढ खुंटल्याने विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. ही स्थिती नंतरच्या आयुष्यात आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक समस्या निर्माण करते. 1920च्या दशकात स्कॉटिश पोषणतज्ञ जॉन बॉयड ऑर यांनी प्रथम प्रस्तावित केलेल्या धोरणाचा बहुतेकांना फायदा होऊ शकतो. त्यांनी अधिक पौष्टिकतेने समृद्ध आहार देण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांची तरतूद करावी, अशी शिफारस संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली होती. सध्या इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी नव्याने सुरू केलेल्या मोफत शालेय पोषण आहाराच्या कार्यक्रमाच्या मुख्य स्तंभांपैकी दूध हा एक मुख्य घटक आहे. जॉन बॉयड ऑर यांनी शतकभरापूर्वी केलेल्या सूचनांचा जगभराच्या सरकारांनी वेळीच विचार केला असता, तर आज कुपोषणाचे जागतिक चित्र इतके भेसूर नसते.
विकसनशील देशांमधील मागणीत निरंतर वाढ
विकसनशील देशांमधील मुलांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्याचे दुधाचे उत्पादन तुलनेने अतिशय कमी आहे, याच देशातील मुलांना त्याची सर्वात जास्त गरज आहे. म्हणूनच मानवी कल्याणाच्या बाबतीत, आपण इंडोनेशियन ट्रेंडचे स्वागत केले पाहिजे. दुग्धजन्य पदार्थ तुलनेने महाग आहेत आणि जगभरात जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारत जाते, लोकं मूलभूत निर्वाह पातळीपेक्षा वरच्या पायरीवर जात असताना दुधाचा वापर जास्त करू लागतात, पर्यायाने त्याच्या मागणीत मोठी वाढ होते. गायीचे दूध वापरणारे लोकं कालांतराने म्हशीचे अन् मग पुढे A-2 वैगेरे गुणवत्तापूर्ण अन् महाग पर्यायांवर शिफ्ट होत जातात. हे अव्याहत चक्र आहे, जे सध्या सर्वाधिक वेगाने गती घेत आहे. म्हणूनच दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेत येत्या दशकात दुधाच्या वापरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने गेल्या आठवड्यातच एका अहवालाद्वारे तसे सूचित केले होते. अर्थात, ते या मागास देशांच्या बहुप्रतिक्षित आर्थिक विकासाचे एक सकारात्मक लक्षण आहे.
दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 24 ऑगस्टला..
