भूषण वडनेरे, धुळे
धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पिंप्राड हे लहानसे गाव आहे. या गावात प्रयोगशील शेतकरी लिलाधर मन्साराम सोनार (40) यांची वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असून विविध प्रयोगांसाठी ते परिसरात प्रसिध्द आहेत. त्यांनी अवघ्या एक एकरात फुलकोबीची (फ्लॉवर) लागवड करुन 6.5 टन एवढे विक्रमी उत्पादन घेतले. या फुलकोबीला बाजारात चांगला भाव मिळाल्याने त्यांना खर्च वजा जाता तब्बल 2 लाखांचा नफा झाला. इतकेच नव्हेतर धुळे जिल्ह्यात सर्वप्रथम काळ्या गव्हाची प्रायोगिक तत्वावर लागवड करुन त्यांनी यशस्वीरित्या उत्पादन घेतले. आता त्यांनी पशुधन वाढविण्यासोबतच सेंद्रीय शेतीकडे वाटचाल सुरु केली आहे. अल्पभुधारक असलेले लिलाधर सोनार हे अतिशय कष्टाळू व तेवढेच प्रामाणिकही आहेत. कष्टावर त्यांची नितांत श्रध्दा असल्याने त्यांनी स्वत:ला पुर्णवेळ काळ्या आईच्या सेवेत झोकून दिले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावालगत असलेल्या पिंप्राड गावात बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून आहेत. याच गावात लिलाधर मन्साराम सोनार यांची अडीच एकर बागायत शेती आहे. पाण्यासाठी त्यांनी शेतातच बोअरवेल केला आहे. त्यामुळे पाण्याची कोणतेही कमतरता नाही. लिलाधर यांनी शेतीचे सर्व धडे आपले वडील मन्साराम सोनार यांच्याकडून अगदी लहानपणापासूनच घेतले आहेत. त्यामुळे शेतीतील बारीक-सारीक बाबींची त्यांना चांगल्याप्रकारे जाण आहे. त्यांचे वडील मन्साराम सोनार हे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावतानाच पारंपारिक शेतीही करत. वडीलांचे कष्ट व प्रामाणिकपणा हे गुण आपोआपच लिलाधर सोनार यांच्यात आले. वडीलांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीकडे पुर्णवेळ लक्ष केंद्रीत केले. परंतु, आता ते थकल्याने शेतीचा सर्व भार लिलाधर सोनार हे समर्थपणे पेलत आहेत.
लिलाधर सोनार हे बारावी, आयटीआय झाले असून सुरवातीच्या काळात त्यांनी नोकरीसाठी प्रयत्नही केले. कारण केवळ अडीच एकर शेती व बेभरवशाचा निसर्ग यामुळे भविष्याची चिंता त्यांना सतावत होती. अखेर त्यांना पुण्यातील एका कंपनीत नोकरीही मिळाली. परंतु, तेथे मिळणारा पगार समाधानकारक नव्हता. त्यामुळे गावाकडे जावून स्वत:च्या हिमतीवर काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. अन् नोकरी सोडून गावाकडे आले. तोपर्यंत त्यांचा विवाह देखील झालेला होता. त्यांना पत्नी योगिता सोनार यांनीही भक्कम पाठबळ दिल्याने लिलाधर सोनार यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरवात केली. कारण मेहनतीला फळ मिळतेच, यावर लिलाधर यांचा विश्वास होता. अखेर शेतातील विविध प्रयोगांमुळे ते अल्पावधीतच परिसरातच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रसिध्द झाले.
फुलकोबीचे विक्रमी उत्पादन
लिलाधर सोनार यांनी वडीलांप्रमाणे पांरपारिक पिके न घेता त्यात वैविध्य आणले आहे. आपल्या अडीच एकर क्षेत्राचा पुरेपूर वापर करत ते भाजीपाला लागवडही करीत आहेत. त्यांनी गेल्या हंगामात अडीच पैकी एक एकरात फुलकोबीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी अकोले (कोपरगांव) येथील नर्सरीतून एक रुपयाप्रमाणे 10 हजार रोपे आणली. त्यांनी पिकांना वेळेवर पाणी, खते व फवारणी केल्याने फुलकोबीची जोमदार वाढ झाली. अगदी एक किलोहून अधिक वजनाच्या व पांढरी शुभ्र फुलकोबी तयार झाली. परिणामी, अवघ्या एकरात लागवड केलेल्या फुलकोबीचे विक्रमी 6.5 टन उत्पादन झाले. फुलकोबी दिसायला अतिशय उठावदार असल्यामुळे तिला बाजारात भावही चांगला मिळाला.
दोन लाखांचा निव्वळ नफा
लिलाधर सोनार हे अतिशय मेहनती आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वतःच फुलकोबीची तोडणी केली. तथापि, सुरवातीला त्यांनी मजुरांना तोडणीसाठी बोलवलेही होते. परंतु, मजुरी न परवडणारी असल्याने लिलाधर यांनी स्वत:च तोडणी केली. इतकेच नव्हेतर दररोज पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास स्वत:च दुचाकीला फुलकोबीचे कॅरेट बांधून ते मार्केटला पोहचवले.
विविध मार्केटमधील दराचा अंदाज घेत त्यांनी शिरपूर, शिंदखेडा, सोनगीर, नरडाणा, येथील मार्केटमध्ये विक्री केली. त्यांची फुलकोबी इतरांपेक्षा अधिक उठावदार असल्याने व्यापार्यांकडून त्यांना सुरवातीला 55 ते 71 रुपये प्रतिकिलो असा विक्रमी दर मिळाला. नंतरच्या काळात बाजारात आवक वाढत गेल्याने हे दर 30 रु., 20 रु व शेवटी 15 रुपयांपर्यंत खाली आले. मात्र, सुरवातीच्या काळात अधिक मालाची विक्री झाल्याने लिलाधर सोनार यांना एकूण 6.5 टन फुलकोबीच्या विक्रीतून 2.25 लाखांचे उत्पादन झाले. त्यातून रोपे, खत, फवारणी व निंदणीचा खर्च वजा जाता 2 लाखांचा निव्वळ झाला.
इतर पिकातूनही चांगले उत्पादन
लिलाधर सोनार यांनी फुलकोबीसोबतच उर्वरित दीड एकर क्षेत्रात हरभरे, भूईमूग, कोथंबिरची लागवड केली होती. त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न झाले. विशेष म्हणजे आपल्या शेतातील कोथीबिंर दुचाकीला बांधून ते गावोगाव स्वत: विक्री करत होते. परंतु, शेतातून मोठ्या प्रमाणात निघणारा माल व होणारी विक्री याचे व्यस्त प्रमाण असल्याने त्यांनी उर्वरीत मालाची मार्केटमध्ये ठोक विक्री केली. दरम्यान, बर्याचदा माल विक्रीतून केवळ उत्पादन खर्च निघतो. त्यावरच समाधान मानावे लागत असल्याचेही लिलाधर सांगतात.
सेंद्रीय शेतीकडे वाटचाल
काळाची गरज लक्षात घेता लिलाधर सोनार यांनी आता आधुनिकतेसोबतच सेंद्रीय शेतीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी गेल्याच वर्षी दोन गायी घेतल्या. शिवाय आता एक वासरुही आहे. त्यांच्या शेणखताचा वापर शेतीसाठी करण्यास सुरवात केली आहे. शिवाय पिकांवर किटकनाशकांचा वापर कमी करुन आता निंबोळी अर्काचा वापर करण्यावर ते भर देत आहेत. गायींमुळे दुधातून अतिरिक्त उत्पन्न सुरु झाल्याचे लिलाधर सांगतात. भविष्यात आणखी पशुधन वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. या पशुंचा चार्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते मक्याची लागवड करत आहेत.
सेंद्रीय शेतीकडे वळताना टप्प्या-टप्प्याने वळावे लागते, रासायनिक खताची सवय असलेल्या मातीला सेंद्रीय खताची सवय होण्यास अवधी लागतो, असेही लिलाधर सांगतात. येत्या काळात पुर्णतः देशी वाणांचे विषमुक्त उत्पादन घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. दरम्यान, वडील मन्साराम सोनार हे देखील पुर्वी देशी बाजरीची लागवड करीत होते. अजुनही त्यांच्याच मागदर्शनात आपण यशस्वीपणे शेती करीत असल्याचे लिलाधर सांगतात.
परिवाराची भक्कम साथ
लिलाधर सोनार यांना शेती व्यवसायात परिवाराची भक्कम साथ मिळत आहे. त्या जोरावरच ते शेतीत विविध प्रयोग यशस्वीपणे करत आहेत. बर्याचदा मजुरांची टंचाई भासते किंवा मजुरी न परवडणारी असते. अशावेळी अर्धांगिणी योगीता सोनार या स्वतः शेतात राबण्यास येतात. त्या पोस्ट ग्रॅज्युएट, बी.एड. झाल्या असल्या तरी शेतकर्याच्याच कन्या आहेत. त्यामुळे त्यांची मोठी मदत होते. शिवाय आता वडील मन्साराम सोनार हे थकले असले तरी त्यांचे वेळोवेळी बहुमूल्य मार्गदर्शन लाभत असल्याचे लिलाधर सोनार सांगतात. विशेष म्हणजे लिलाधर सोनार हे सामाजकार्यातही आघाडीवर आहेत. करोना महामारीत ते अनेकांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळे सुवर्णकार समाजातर्फे तत्कालिन महापौर चंद्रकांत सोनार यांच्या उपस्थित त्यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय खान्देश हितसंग्राम संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष असून शेतकर्यांवर होणार्या अन्यायाविरोधात ते आवाज उठवत असतात.
भविष्यातील नियोजन
केवळ अडीच एकर शेती असल्याने त्यावरच अबलंबून न रहाता शेतीपुरक उद्योग सुरु करण्याचा लिलाधर यांचा मानस आहे. कुटूंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे शासकीय योजनेतून एखादा शेतीपुरक उद्योग सुरु करता येईल का, यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. विशेषतः शेतीमालावर प्रकिया करणारे उद्योग जसे की पापड, व्हेपर्स, पशुखादय इ. सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही लिलाधर सांगतात. तसेच त्यांना गो पालनाची विशेष आवड असल्याने भविष्यात आणखी गायींची संख्या वाढविणार असल्याचेही ते सांगतात.
काळ्या गव्हाचे यशस्वी उत्पादन
लिलाधर सोनार यांनी गेल्या वर्षी सुमारे पाउण एकर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर काळ्या गव्हाची लागवड केली होती. जिल्ह्यात त्यांचा हा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे छोट्या प्रमाणात लागवड केली. त्यासाठी हरियाणा येथील सुखदेवसिंह यांच्याकडून 200 रुपये किलोप्रमाणे काळ्या गव्हाचे बिज मागविले. 15 नोव्हेंबर 2021 रोजी पेरणी केली. या गव्हाला साधारण गव्हापेक्षा एक-दोन पाणी जास्तीचे लागले. फेब्रुवारी-मार्चमध्ये गहू निघाला.
त्यात वातावरणीय बदलामुळे एकूण साडेतीन क्विंटल गहू झाला. या गव्हाची विक्री न करता तो स्वतःसाठी ठेवला. तर काही आप्तस्वकीयांना भेट म्हणून दिला. त्यांनी या गव्हाबाबत सोशल मीडीयावर पोस्ट टाकल्यानंतर अनेकांनी त्यांच्याकडे मागणी नोंदवली होती. काळा गहू हा तणाव, लठ़ठपणा, कॅन्सर, डायबेटीस आणि हृदयाशी संबंधित आजारांना आळा घालण्यास मदत करतो. त्यात झिंकची मात्राही जास्त असते. त्यामुळे येत्या काळात अधिक क्षेत्रात काळ्या गव्हाची लागवड करणार असल्याचे लिलाधर सोनार यांनी सांगितले.
शेतकर्यांनी पारंपारिक पध्दतीने पिके न घेता वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. सेंद्रीय शेतीवर अधिक भर द्यायला हवा. विषमुक्त शेतीमुळे जमीनीचा पोत सुधारतो व उत्तम दर्जाची पिके घेता येतात. तसेच शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने बर्याचदा लहरी हवामानाचा फटका बसून नुकसान होते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाकडेही शेतकर्यांनी वळले पाहीजे.
– लिलाधार मन्साराम सोनार
प्रयोगशील शेतकरी,
पिंप्राड, ता.शिंदखेडा, जि.धुळे