राज्याच्या काही भागात आजही पावसाचे अवकाळी फटाके फुटणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या 2-3 दिवसांपासून कोकण, मुंबई-ठाण्यासह, पुणे, नगर आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून (आयएमडी), येत्या 24 तासात राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरात धनत्रयोदशीला, काल, शुक्रवारी सायंकाळी सुमारे दीड तास वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. दिवाळी निमित्ताने विविध प्रकारची खरेदी करायला बाहेर पडलेल्या पुणेकरांची या पावसामुळं दैना उडाली. पुण्यासह कोकणातील अनेक भागात आणि कल्याण-डोंबिवलीतही जोरदार पाऊस झाला. मुंबई महानगर क्षेत्रातील काही भागात त्यामुळे वीजपुरवठा ठप्प झाला होता. गोव्यातही मुसळधार पाऊस झाला.
‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य-पूर्वेकडे सक्रीय आहे. परिणामी राज्यभरात बदललेले वातावरणात अजून कायम आहे. त्यामुळे आज, शनिवारी, 11 नोव्हेंबर रोजीही गोव्यासह कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याकडून सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे लगतच्या जिल्ह्यातील काही भागातही पाऊस होऊ शकेल. काही भागात ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकेल.
देशात 14 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार
आयएमडीच्या अनुमानानुसार, देशात विशेषत: दक्षिण भारतात 14 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप, पुद्दुचेरी, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राजस्थान, उत्तर प्रदेशसह दिल्लीतही आज पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेश आणि लगतच्या भागात आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी असून धुकेही दिसत आहे.
प्रदूषणावर पावसाचा उतारा परिणामकारक
राज्यातील अनेक शहरांसह देशभरातील काही राज्यातही अलीकडे प्रदूषण वाढले होते. या वाढत्या प्रदूषणावर पावसाचा उतारा परिणामकारक ठरला. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यास मदत झाली. अन्यथा, दिल्लीसह महाराष्ट्र सरकारनेही कृत्रिम पावसाचा उपाय करण्याचे नियोजन सुरू केले होते.