मुंबई : येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘अप्रतिम मीडिया फाउंडेशन’तर्फे नुकतीच पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद संपन्न झाली. या परिषदेत देवगाव (ता.पैठण) येथील ‘जय जवान, जय किसान’ या शेतकरी गटाला प्रयोगशील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, ‘अप्रतिम मिडिया’चे संचालक डाॅ. अनिल फळे, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. शाश्वत विकासात शेती आणि शेतकरी वर्गाची भूमिका महत्त्वाची असून प्रयोगशील शेतक-यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा सन्मान करण्यात येत असल्याचे परिषदेचे समन्वयक राहुल कुलकर्णी यांनी सांगितले.
‘जय जवान, जय किसान’ या शेतकरी गटाची स्थापना वर्ष २०११-१२ या शेतीवर पसरलेल्या कोरड्या दुष्काळाच्या काळात झाली. या दुष्काळी परिस्थितीत गटातील शेतक-यांनी एकत्र येत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करून फळबागा वाचविल्या. तेव्हापासून गटातील शेतकरी शेती आणि शेती पूरक विविध प्रयोग करत आहेत.
दुष्काळातून धडा घेत येथील या शेतक-यांनी शेततळ्यांची निर्मिती केली, जलपुनर्भरणासाठी प्रयत्न केले. बी-बियाणे, खतांची थेट कंपन्यांकडून एकत्रित खरेदी केली. शेती उत्पादनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी विनानांगरणी तंत्राचा वापर काही शेतकरी करत आहेत. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय आणि जोडधंदा म्हणून रेशीम शेती यशस्वीपणे गटातील शेतकरी करत आहेत. या गटाचे समन्वयक दीपक जोशी हे शेतीचा बारकाईने अभ्यास करून गटातील शेतक-यांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- द्राक्ष – भुरीचे नियंत्रण..; डिसेंबर महिन्यातील व्यवस्थापन
- कांदा बाजारभाव ; या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर