मुंबई : शासनाकडून शेतकर्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकर्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे महत्वाची असतात. त्यापैकी आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. आधार हे सर्वच ठिकाणी तर आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (Pan Link To Aadhar) करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी शासनाकडून काही महिन्यांची मुदत देखील देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी (दि.31) रोजी ही मुदत संपत आहे. तुम्ही जर आज हे काम केले नाही तर नुकसान सहन करावे लागेल.
कर भरणे, प्राप्तीकर विवरण पत्र भरणे यासह आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्वच कामांसाठी पॅनकार्ड अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून लिंकींगला सुरुवात करण्यात आली आहे. 31 मार्च 2022 पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे मोफत होते. त्यानंतर सरकारने 1 एप्रिल 2022 पासून यात बदल करुन 30 जून 2022 पर्यत लिंक केल्यास 500 रुपये दंड आकारण्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्याने सरकारने दंडात वाढ करून 500 वरुन 1000 पर्यंत केले. तसेच पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
तर होईल हे नुकसान…
दिलेल्या मुदतीत तुम्ही पॅन आधारशी लिंक केले नाही तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. त्या सोबतच तुम्ही जर का पीएम किसान सन्मान निधी योजना यासारख्या योजनांचा लाभ घेत असाल तर त्याचा लाभ देखील मिळणे बंद होवू शकतो. त्यामुळे दिलेल्या मुदतीत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे गरजेचे आहे.
घरबसल्या करा लिंक
तुम्हाला जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करायचे असेल तर तुम्ही घर बसल्या देखील दंडाची रक्कम भरुन हे काम करु शकता. त्यासाठी प्राप्तीकर विभागाचे संकेतस्थळ https://www.incometax.gov.in भेट द्यावी लागेल. त्यानंतर आधार लिंकचा पर्याय निवडावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्डचा 12 अंक प्रविष्ट करावे लागतील. त्यानंतर व्हॅलिडेट (Validate) चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल. हे केल्यानंतर तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक होईल.