कृत्रिम पावसाचा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील 2017-19 मधील प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. इथे पावसाच्या ढगांवर खास विमानातून ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराइड क्षारांची रासायनिक फवारणी केली गेली होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण 18% इतके वाढल्याचे दिसून आले आहे.
पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजी’च्या (आयआयटीएम) हवामान शास्त्रज्ञांच्या निष्कर्षाआधारे, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने यासंबंधी अहवाल जुलै 2023 मध्ये प्रसिद्ध केला होता. आता अमेरिकन हवामान विज्ञान सोसायटीकडून त्यांच्या बुलेटीनमध्ये हा अहवाल पुन:र्प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रसिद्ध झाला आहे. ढगांवर रसायन फवारून पावसाचे प्रमाण वाढवण्याच्या या तंत्राला हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग असे नाव आहे.
करार शेती… म्हणजे शेतकर्यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी। Contract Farming।
हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञान नेमके आहे काय?
ज्या भागात शून्य अंशापेक्षा जास्त तापमान आहे, त्याच भागात हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग तंत्र वापरता येते. अशा परिसरातील विशिष्ट घनतेच्या पावसाच्या ढगांवर खास विमानातून कॅल्शियम क्लोराइडचा मारा केला जातो. ज्या ठिकाणी अशी फवारणी केली गेली, त्या परिसरात सामान्य सरासरीपेक्षा 18% जास्त पाऊस नोंदविला गेल्याचे प्रकल्प प्रमुख डॉ. तारा प्रभाकरन यांनी अमेरिकन मेट्रॉलॉजी विभागाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पाणी, बर्फयुक्त पावसाच्या 267 ढगांवर प्रयोग
2017-19 मधील दोन वर्षांच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग प्रयोगाचा प्रभाव पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी 267 ढगांचे नमुने तपासले. तसेच हा प्रयोग करण्यासाठी एक स्पेशल एयरक्राफ्टचा वापर करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी यासाठी ग्लेशियोजनिक सीडिंग टेक्नीकही वापरले. ढगांच्या थंड पाण्याच्या भागावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या प्रयोगातून सोलापूरच्या आसपास 100 किलोमीटर परिसरात जास्त पाऊस पडल्याचे दिसून आले.
दोन विमानांची प्रत्येकी 103 उड्डाणे
या प्रयोगाच्या अभ्यासासाठी दोन विमानांची प्रत्येकी 103 उड्डाणे झाली. निश्चित केलेल्या 145 ढगांमध्ये एका विमानाद्वारे ‘कॅल्शियम क्लोराइड’च्या क्षारांची फवारणी करण्यात आली. 122 ढगांमध्ये फवारणी केली गेली नाही. सर्व ढगांमधील प्रक्रियांचा दुसऱ्या विमानाद्वारे अभ्यास करण्यात आला. कायपिक्सच्या चौथ्या टप्प्यात वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि संशोधक अशा 25 जणांचा सहभाग होता. या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकन हवामान विज्ञान सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्येही आता प्रसिद्ध झाले आहेत.
आयआयटीएम शास्त्रज्ञांच्या परिश्रमांमुळे भारतीय ढगांचे अंतरंग समोर
आयआयटीएम संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी सांगितले, “देशातील मोठा भूभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो; तसेच दुष्काळाच्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठीही कृत्रिम पावसाचा पर्याय योग्य असल्याचे कृत्रिम पावसाच्या प्रकल्पातून सिद्ध झाले. 2009 पासून ‘आयआयटीएम’मधील अनेक शास्त्रज्ञांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे भारतीय ढगांचे अंतरंग समोर आले आणि कृत्रिमरीत्या पावसात वाढ करण्याची वैज्ञानिक पद्धतही समजली.”
चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।
2009 पासून कृत्रिम पावसासाठी कायपिक्स प्रकल्प
कृत्रिम पावसासाठी 2009 मध्ये ‘आयआयटीएम’च्या पुढाकाराने कायपिक्स हा प्रकल्प सुरू केला गेला होता. या चौथा टप्पा 2017-19 या दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आला होता. त्यातून सोलापूर जिल्ह्यात त्यावर्षीच्या मान्सून काळात प्रत्यक्ष कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले. त्यासाठी अमेरिकेहून दोन खास विमाने मागवली गेली होती. एका विमानातून ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराइड क्षारांची फवारणी केली गेली. त्यापाठोपाठ येणाऱ्या दुसऱ्या विमानाने फवारणीनंतर ढगांमध्ये घडलेल्या प्रक्रियांच्या नोंदी घेतल्या. सोलापूर जिल्ह्यातील 130 ठिकाणी पर्जन्यमापक बसवण्यात आले होते. त्याच्या साह्याने रासायनिक फवारणीनंतर कोणत्या भागांत, किती वेळात, नेमका किती पाऊस पडला, याची पडताळणी करण्यात आली.
जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रयोग
या प्रयोगांच्या निष्कर्षांबाबत कायपिक्स प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. तारा प्रभाकरन म्हणाल्या, ‘कृत्रिम पावसाचे प्रयोग जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्णतः वैज्ञानिक पद्धतीने पार पडले. त्यासाठी रडारचा उपयोग, न्यूमेरिकल मॉडेल आणि रँडम सॅम्पलिंगची पद्धत वापरण्यात आली. मान्सून काळात नैसर्गिकरीत्या पाऊस सक्रिय नसताना आम्ही निवडलेल्या काही ढगांमध्ये क्षारांची फवारणी करण्यात आली. काही ढगांमध्ये क्षारांची फवारणी केली नाही. दोन्ही प्रकारच्या ढगांमधून ज्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो तेथील पर्जन्यमानाच्या नोंदी तपासण्यात आल्या.’
योग्य कार्यपद्धती वापरल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी
‘मान्सून काळात पाण्याचे विशिष्ट प्रमाण असलेल्या आणि वरच्या दिशेने वाढणाऱ्या ढगांमध्ये ठराविक वेळेत क्षारांची फवारणी केल्यास पावसाच्या प्रमाणात वाढ होते, हे कायपिक्स प्रकल्पाच्या प्रयोगांतून सिद्ध झाले. विमानांद्वारे ढगांमध्ये क्षारांची फवारणी केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या 43 पर्जन्यमापकांवरील नोंदींनुसार पावसाचे प्रमाण 46 टक्क्यांनी वाढले; तर सी बँड रडारच्या नोंदींनुसार 100 वर्ग किलोमीटर क्षेत्रातील पावसामध्ये 18 टक्के वाढ झाली. प्रत्येक उड्डाणातून झालेल्या क्षारांच्या फवारणीनंतर सुमारे 867 दशलक्ष लिटर पाणी जमिनीवर आले. ढगांची नेमकी माहिती असेल, योग्य कार्यपद्धती वापरली, तर कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होतो आणि तो किफायतशीरही आहे, हे या प्रकल्पातून सिद्ध झाले,’ असेही डॉ. तारा म्हणाल्या.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले प्रमाणित बियाणे पुरवण्यासाठी आता नवीन सहकारी समिती BBSSL – अमित शहा
- शेजारच्या शेतजमिनीतून बैलगाडीला मार्गासाठी सरसकट परवानगी; शेताकडील वहीवाटीचा रस्ता अडवल्याने त्रस्त लाखो शेतकऱ्यांना दिलासा