पल्लवी खैरे
सध्याच्या काळात जगण्यासाठीची स्पर्धा खूपच वाढली आहे. प्रत्येकजण या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. या शर्यतीत टिकायचं म्हणजे आपली आर्थिक बाजू मजबूत असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी धडपडत आहे. आजची पिढी पैशाच्या मागे धावणारी आणि स्वतःचा फायदा आधी बघणारी म्हटलं जात. पण ही गोष्ट खोटी ठरवत एका महिलेने प्रेरणादायी कामगिरी केली आहे. होय, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अंजली अनिल चव्हाण (वय 41) यांनी आपलं आयुष्य तर बदललंच आहे. पण, इतर महिलांना देखील त्या प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी नागरदेवळा गावातील महिलांना एकत्र आणत तब्बल 180 बचत गटांची स्थापना केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांनी आग्नावंती फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. चला तर मग जाणून घेवूया अंजली चव्हाण यांच्या खडतर प्रवासाबद्दल…
अस्सल देवगड हापूस आंबा खावासा वाटतोय पण…
https://youtu.be/xMZLeqr2Es8
अंजली चव्हाण यांचं लग्न 2000 साली झालं आणि नाशिक सारख्या शहरातून त्या नागरदेवळा या छोट्याशा गावामध्ये आल्या. आयुष्यात कधीतरी असं एखादं वळण येतं की, त्यामुळे सगळं आयुष्यच बदलून जातं. आधीच्या सरळसोट आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि आयुष्य अगदी नव्यानं सुरू होतं. लग्नानंतर एकत्र कुटूंब आणि गावातलं वातावरण बघता अंजली यांना अतिशय अवघडल्यासारखं वाटत होत. काहीतरी करायचे आणि शिकण्याची जिद्द अंजली यांच्या मनात होती. त्यांच्या पतींचा प्रिंटिंग प्रेस हा व्यवसाय होता. त्या वेळेला स्क्रीन प्रिंटिंगचे काम सुरु होते. अशातच अंजली यांनी डीटीपीच्या कामांमध्ये मदत करण्याचे ठरवले. हे सर्व करत असताना एकत्र कुटुंब पद्धत आणि सर्व गोष्टींचा सामना अंजली यांना करावा लागला. यानंतर त्या बचत गटात सामील झाल्या आणि त्यानंतर त्या बचत गटाच्या सदस्य झाल्या.
कंपनीची स्थापना केली
बचत गट तयार करण्याची प्रेरणा अंजली चव्हाण यांना एका कृषी मासिकातून मिळाली. या मासिकात आलेल्या महिलांच्या यशोगाथा त्या वाचायच्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वामी फूड या नावाने व्यवसाय सुरु केला. या स्वामी फूडमध्ये केळी चिवडा, केळी वेफर्स इत्यादी बनवले जात असून महाशिवरात्रीच्या दिवशी धुळे, औरंगाबाद, पुणे येथे त्याची विक्री देखील झाली आहे. यानंतर अंजली चव्हाण यांनी स्वतःचा बचत गट देखील स्थापन केला. आणि त्यांना पंचायत समितीमध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम मिळाले. तसेच गाव पातळीवर जावून वर्धिनीचे काम देखील केले. त्यानंतर अंजली यांना वाटलं की, आपण शेतकरी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शेतकरी महिला या स्वयंसहायता समूहातील असून त्यांच्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व महिलांच्या मदतीने त्यांनी अग्नावंती फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून सर्व शेतकर्यांना एकत्र आणून एका छोट्या गावामध्ये कंपनीचे स्वप्न त्यांनी साकारले. या कंपनीच्या माध्यमातून डाळ महोत्सवाचे आयोजन देखील महिलांनी केले होते.
महिला एकजुटीने येऊन करताय काम
हे सर्व करत असतांनाही आम्ही कुठेही न थांबता आमचे काम चालूच ठेवले आणि आज आमच्या गावात जवळजवळ 180 बचत गट आहेत. मी अनेक कामे महिलांसाठी गावांमध्ये केलेली असून आज अनेक महिला एकजुटीने येऊन कामे करत आहेत. आणि याचेच फलित म्हणून नगरदेवळा सारख्या छोट्या गावात आम्ही अग्नावंती शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. कंपनीचा कारभार माझ्यासोबत सर्व महिला सांभाळत असल्याचे अंजली चव्हाण यांनी सांगितले. आज मी अग्नावंती फार्मर प्रोड्युसर कंपनीची चेअरमन म्हणून काम बघते. एका छोट्याशा गावातली एक सून एका शेतकरी उत्पादक कंपनीची चेअरमन होते. ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. हे सर्व करत असताना मला अनेक अडचणी आल्या. ग्रामीण भागातील वातावरण आर्थिक परिस्थिती या सर्वांवर मात करून माझ्या पतींसह मैत्रिणींच्या सहकार्याने आज आमच्या गावात माझे चांगल्या पद्धतीचे व्यवसायाचे काम सुरू आहे.
बँकेतील कामे झाली सुरळीत
सेंट्रल बँक ऑफ इंडियाची नगरदेवळा येथील शाखा ही परिसरातील एकच जुनी व ग्राहकांची विश्वास पात्र बँक आहे. मात्र येथे कर्जाच्या फाईली धूळ खात पडून होत्या आणि एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने ते बंद होते. तसेच महिलांना असभ्य वर्तणूक दिली जात होती. रोजगार बुडवून दिवसभर गावातील व खेड्यापाड्यातील नागरिक उभे राहत आणि कर्मचारी नसल्याचे कारण सांगून त्यांना हेलपाटे मारावे लागत होते. अशातच अंजली चव्हाण यांच्यासह अभिलाषा रोकडे, भाग्यश्री पाटील, हेमलता महाजन, सरिता निकम, माधुरी महाजन, सविता पवार, अनिता परदेशी, प्रतिभा पाटील, पूनम पाटील यांनी बँकेला टाळे ठोकण्यात येतील असे निवेदन ब्रांच मॅनेजर यांना दिले होते. त्यानंतर आता बँकेतील कामे सुरळीत सुरु असून बचत गटातील महिलांची कामे देखील होत आहे.
अनेक अडचणींवर केली मात
जेव्हा कोणी एखादा नवीन व्यवसाय सुरु करतो तेव्हा त्याच्या आसपासचे लोक त्याला वेड्यात काढतात. अनेकजण पाय मागे ओढणारेही असतात. व्यवसाय म्हटलं की त्याचा अभ्यास करून धाडस करणे हे क्रमप्राप्तच आहे. परंतु, यावेळी आपल्याला टोमणे मारणार्यांकडे दुर्लक्ष करून आपले काम अधिक प्रभावीपणे करणे गरजचे आहे. अंजली यांना पहिली अडचण ही अग्नावंती फार्मर प्रोड्यूसर कंपनीची नोंदणी करण्यासाठी लागणार्या शेतकरी दाखला घेण्यासाठी आली. त्यांच्या सोबत असणार्या महिलांना कागदपत्रांसह बँकेतून कर्ज घेण्यासाठी अडचणी आल्या. परंतु, न खचता न डगमगता अंजली यांच्यासोबत असणार्या महिलांनी प्रत्येक अडचणींवर मात केली. तसेच जळगाव जिल्हा कृषी विभागाचे संचालक अनिल भोकरे, प्रकल्प विशेषज्ञ कृषी अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आता अग्नावंती कंपनीची नोंदणी देखील झाली आहे.
महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून यशस्वी व्हावे
ग्रामीण भागातील महिलांना एक भीती असते. मी जी काही वस्तू तयार केली आहे, त्याची खरोखरच विक्री होईल का?.. यासाठी महिलांनी आपल्या मनातील भीती काढून आपण जे बनवलं आहे किंवा एखादी वस्तू तयार केली आहे. जर त्याबद्दलची माहिती लोकांना पटवून दिली तर नक्की ग्रामीण भागातील महिला देखील उद्योजिका बनू शकते. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा आणि मनातील भीती महिलांनी काढावी.
– सौ. अंजली अनिल चव्हाण,
रा. नगरदेवळा, ता. पाचोरा जि. जळगाव.