भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. आता बदलत्या आधुनिक युगात शेतीचे गणित देखील बदलत आहे. म्हणजेच आता शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यासोबतच आधुनिक पद्धतीने देखील शेती करून बक्कळ नफा कमावत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांची शेती पूर्वीपेक्षा थोडी सोपी झाली आहे. तसेच नफ्यातही वाढ झाली आहे. असेच एक तंत्र म्हणजे बहुस्तरीय शेती म्हणजेच ‘मल्टीलेअर फार्मिंग’चा मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आकाश चौरसिया यांनी शोध लावला आहे. या ‘मल्टीलेअर फार्मिंग’मधून ते वर्षाला 50 लाख रुपयांपर्यंतची कमाई करत आहे.
आकाश चौरसिया हे 32 वर्षांचा आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमधील सागर या छोट्याशा गावात झाला. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. लोक इतके आजारी का पडतात ?, असा प्रश्न त्यांना लहानपणापासून असायचा. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यातील बहुतांश आजार हे खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात. त्यांनी ठरवले की आपण ही समस्या संपवू. या विचाराने 2010 मध्ये त्यांनी जमिनीच्या छोट्या तुकड्यातून सेंद्रिय शेती सुरू केली. त्यांच्या कुटुंबाने आधीच सुपारीची लागवड केली होती.
‘मल्टीलेअर फार्मिंग’ टेक्नॉलॉजीचा लावला शोध
आकाश चौरसिया यांना एकाच जमिनीवर अनेक पिके घेण्याची कल्पना सुचली. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या आव्हानांची चांगलीच जाण होती. सुरुवातीला त्यांनी दोन थर तयार केले एक जमिनीच्या आत आणि दुसरा पृष्ठभागावर. यानंतर त्यांनी या शेतीत सुरुवातीला टोमॅटो आणि कारल्याचे पीक घेतले. दोन थरांची पिके घेऊन त्यांनी बहुस्तरीय शेती सुरू केली. त्यात दोन थर करण्यात आले. एक जमिनीच्या आत आणि दुसरा पृष्ठभागावर. सुरुवातीला आकाशने टोमॅटो आणि कारले पिकवून सुरुवात केली. यानंतर त्यांनी इतर कॉम्बिनेशन्सचेही प्रयोग केले. लवकरच आकाश यांनी त्याच्या पहिल्या आव्हानाचा सामना केला. ती समस्या गवत आणि तणांची होती. या समस्येसाठी आकाश यांनी पृष्ठभागावर पालेदार पिके घ्यायला सुरुवात केली. यात पालक, धने, मेथी या पिकांचा समावेश होता. वास्तविक, पानेदार पिके वेगाने वाढतात. त्यामुळे गवत व तणांसाठी फारच कमी जागा उरली. असे करून त्यांनी 80 % टक्के गवताची समस्या नियंत्रित केली.
आलेल्या समस्यांवर उपाय शोधले
पुढील आव्हानामध्ये त्यांना जागेची कमी भासू लागली. शहरातील एका दोनमजली इमारतीतून समाधान मिळाले. दोनमजली इमारतीत कमी जागेत अधिक लोकांना कसे सामावून घेतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर साडेसहा फूट उंचीवर बांबूपासून तयार केलेली रचना तयार केली. त्यावर जाळी लावण्यात आली होती. संरचनेत थोडा प्रकाश आणि थोडी सावली मिळावी हा त्यांचा उद्देश होता. दोन पिके घेतल्यानंतर आकाश चौरसिया यांनी तिसऱ्या थरासाठी वेल असलेली झाडे निवडली. त्यानंतर चौथ्या थरात हंगामी फळझाडे लावली. यामध्ये आंबा, पपई किंवा सपोटा यांचा समावेश होता. या मल्टीलेअर फार्मिंगमुळे पाणी, ताणांसह इतर संसाधनांचीही बचत होते आहे.
वर्षाला 50 लाख रुपयांपर्यंतची कमाई
आकाश चौरसिया यांच्याकडे त्यांच्या सागर गावात शेती करण्यासाठी तीन शेततळे आहेत. त्यापैकी सुमारे 25 एकरात ते शेत करत आहेत. आज आकाश चौरसिया नैसर्गिक पद्धतीने शेती करत असून त्यांची वर्षाला 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत कमाई होत आहे. तर कधीकधी वर्षाला 35 ते 40 लाख रुपयांची कमाई देखील होते. आज त्यांच्याकडे 12 ते 15 जणांची टीम असून ही टीम त्यांना कृषी कार्यात मदत करत आहे.
संपर्क :-
आकाश चौरसिया
सागर, मध्यप्रदेश.,
मो. नं. :- 91790 66275