मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळं राज्यात 82 हजार 246 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीमुळं विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसानं हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात तीळ, ज्वारी, हरभरा, कापूस, पपई, संत्रा, गहू, हळद, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, द्राक्ष, आंबा, टरबूज, हरभरा, काजू, कोकम, जाभूळ अशा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरं आणि जनावरांचं नुकसान केलं आहे.
आधीच खरीप हंगामात दुष्काळ आणि पूर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्याला महिन्याभराच्या अंतरात दोन वेळा अवकाळी पावसाला सामोरं जावं लागल्यामुळे त्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यात विमा कंपन्यांकडून सातत्यानं नुकसान भरपाई देताना टाळाटाळ केली जात आहे. तातडीने या अवकाळी पावसाचे पंचनामे करून बळीराजास मदत मिळणं गरजेचं आहे.