मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनासंदर्भात आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी ठाणे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
पावसाळा सुरू होण्यास आता खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे धरणे, नदी, नाले आदी पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. पाणी साठवणुकीची क्षमता वाढ होणाऱ्या जागांची निवड स्थानिक लोकप्रतिनिधींचा माध्यमातून करावी. तसेच जलयुक्त शिवार टप्पा दोनची कामेही तातडीने सुरू करावीत. हे अभियान लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रशासनाबरोबरच जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वसुंधरा संस्था आदींसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
जलयुक्त शिवार योजनेसाठी 545 कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी 425 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या गावांतील कामांची देखभाल, दुरुस्तीची कामे ही या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तातडीने हाती घ्यावीत. तसेच दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व अटल भूजल योजनेतील गावांना प्राधान्य देण्यात यावे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामे करा – मुख्यमंत्री शिंदे
पावसाची कमी सरासरी व निसर्गाचा लहरीपणा पाहता जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या योजनांच्या कामांना प्राधान्य द्यावे. काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवारच्या टप्पा दोनमध्ये निवड झालेल्या गावांपेक्षा अधिकची गावे निवडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. गावांनी आराखडा तयार करून कामे सुरू करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी व त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेबरोबर आपण स्वतः करणार आहोत. पालकमंत्री यांनी आपल्या जिल्ह्यातील कामांवर लक्ष ठेवावे. सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण अधिकारी यांनी कामांचे नियोजन करावे, कामे दर्जेदार होतील हे पहावे. कुणीही कागदावर कामे न करता प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.