मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दररोज कुठे ना कुठे पाऊस सुरु असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. पाऊस थांबून खरिपाच्या तयारीला सुरुवात करण्याच्या तयारीत शेतकरी असतांना भारतीय हवामान विभागाने पून्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
वातावरणात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच बदल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अर्धापेक्षा जास्त पावसाळा कोरडा गेला. त्यानंतर हिवाळ्यात थंडी खुप कमी वेळा जाणवली. याचा परिणाम खरीप आणि रब्बी या दोनही हंगामातील पिकांवर झाल्याचे पाहावयास मिळाले. रब्बीचे पिक ऐण काढणीवर असतांना राज्यातील काही भागात पाऊस, गारपीट होवून नुकसान झाले. राज्यावर असलेले हे अवकाळी संकट लवकर थांबेल व शेतकरी खरीपाच्या तयारीला लागेल अशी अपेक्षा लागली आहे.
पून्हा पावसाचा इशारा
राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यातच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. येलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि 30 ते 40 प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
या जिल्ह्यांचा समावेश
हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार 16 एप्रिल रोजी बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, लातुर, 17 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातुर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, 18 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अमरावती, गोंदिया तर 19 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, छ. संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.