जळगाव : सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम हा शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. वातावरणातील अनियमित बदलांमूळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दरम्यान, हा रोग पिकांवर कोणत्या कारणांनी होतो?, कोणत्या उपाय योजना केल्याने त्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो? या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.
पावासाचे दोन ते तीन मोठे खंड पडले आहेत, त्यामुळे वातावरणातील तसेच जमिनीचे तापमान प्रचंड वाढले आहे. याचा परिणाम पिकांवर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या परिस्थतीमुळे सोयाबीन पिकांवर देखील पिवळेपणा आल्याचे पाहावयास मिळत आहे, या पिवळेपणाला ‘पिवळा मोझॅक’ असे म्हणतात.
काय आहेत पिवळा मोझॅकची कारणे?
पिवळा मोझॅकचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असतो. परंतु, बिगर मोसमी हंगामात तो मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर जिवंत राहून मोसमी हंगामात सोयाबीन पिकावर संक्रमित होतो. या रोगाचा प्रादुर्भाव हा रोगास बळी पडणाऱ्या वाण / जातीची लागवड केल्यावर वाढतो.
यावर काय उपाय कराल ?
सोयाबीन पिकावर पांढरी माशीच्या सरळ प्रादूर्भावामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होत नाही. पण, हा विषाणू रोग वाहक असल्यास सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक विषाणू रोगाची लागण होण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकाची फेरपालट ही पांढऱ्या माशीची खाद्यपीके म्हणजेच ज्वारी, मका नसलेल्या पिकांबरोबर करावी, तसेच नत्रयुक्त खताचा जास्तीचा वापर टाळावा आणि पीक दाटणार नाही याची काळजी घ्यावी, सोयाबीन लागवड केलेल्या क्षेत्रात पिवळ्या पत्राचे हेक्टरी 20 ते 25 सापळे अर्धा ते 1 फूट उंचीवर लावावेत, तसेच शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, या उपाय योजना केल्यास पिवळा मोझॅकवर नियंत्रण मिळविता येते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव, तातडीने पिकांचे पंचनामे करा
- 65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई