तांत्रिक

कांदा लागवड तंत्रज्ञान…

कांदा हे पीक खरीप, लेट खरीप (रांगडा) व रब्बी अशा तीनही हंगामात घेतले जाते. एकूण क्षेत्रापैकी सरासरी २०% क्षेत्र हे खरीप, २०% क्षेत्र हे लेट खरीप (रांगडा) तर ६०% क्षेत्र हे रब्बी हंगामात राहते. रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन व प्रत चांगली राहते परंतु बाजार भाव कमी मिळतात. त्या तुलनेत नोव्हेंबर ते मार्च महिन्यात निघणाऱ्या खरीप व लेट खरीप कांद्याला बाजारभाव चांगला मिळतो. खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन थोडे कमी (सुमारे ८० ते १०० क्विंटल प्रतिएकर) मिळते. लेट खरीप कांद्याला पोषक हवामान मिळाल्यामुळे उत्पादन व दर्जा चांगला राहतो. एकंदरीत मागणी व पुरवठा यांचा विचार केला असता खरीप व रांगडा हंगामातील कांदा उत्पादन तंत्रज्ञान हे नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान ठरू शकते.

खरीप कांदा लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन निवडावी.

रोपवाटिका व्यवस्थापन

  • रोपवाटिकेच्या व्यवस्थापनातून निरोगी रोपे मिळवली की निम्मी लढाई जिंकली जाते.
  • रोपवाटिकेसाठी शेतातील उंच भागावरील हलकी ते मध्यम जमिनीची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र तसेच प्रती एकरी ४-५ किलो बियाणे लागते.
  • रोपवाटिकेसाठी गादी वाफा / रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी १ मी रुंद, ३ मी लांब व १५ सेमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. मिश्र खत (१०० ग्रॅम १५:१५:१५) व शेण खत (२० किलो) टाकावे.
  • नियमित व योग्य पाणी द्यावे.
  • ४० -४५ दिवसांत रोपे लागवड योग्य होतात.

पुनर्लागवड

  • कांदे जमिनीच्या खाली २५ सेंमीपर्यंत वाढतात. उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम भारी जमिनीची निवड करावी. नांगरणी व वखरणी करून शेतात २० ते २५ टन कुजलेले शेणखत टाकावे.
  • पुनर्लागवडीकरिता रुंद वरंबा व सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी ४-५ फूट रुंदीचे व १२-१५ सेमी उंचीचे शेताच्या लांबीनुसार वरंबे तयार करून १५ x १० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • ओलिताकरिता ठिबक किवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • रोपांचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा. लागवडीपूर्वी रोपे शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.


जमिनीतून दिलेल्या खतांसोबतच फवारणीच्या माधमातून १९:१९:१९ खते १५, ३० व ४५ दिवसांनी व १३:००:४५ खते ६०, ७५ व   ९० दिवसांनी  द्यावे.

कांदा वाढीच्या अवस्थेनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
२० ते २५ किलो गंधक लागवडपूर्व दिल्यास कांद्याची प्रत व टिकवण क्षमता वाढते.

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन 

Related Articles

Back to top button