मुंबई : जगभरातील कृषी आणि डेअरी क्षेत्रावर सध्या मांसाहारी अळीचे नवे संकट आले आहे. ही अळी जनावरांच्या शरीरात घुसून त्यांचे मांस खाते आणि दोन आठवड्याच्या आत गुरा- ढोरांचा मृत्यू ओढवतो. ही अळी फक्त जनावरांसाठीच धोका नसून गोमांसातून मानवाच्या शरीरात घुसून मानवी मेंदूसह इतर अवयवही खाऊ शकते. सध्या अमेरिकेत या अळीचा फैलाव झाला असून तिथले कृषी व डेअरी क्षेत्र चिंतेच्या सावटात आहे. या मांसाहारी अळीविरोधात लढण्यासाठी अमेरिकेन कृषी विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम सुरू केली आहे.
सध्या मेक्सिकोलगतच्या अमेरिकन प्रदेशाला आणि विशेषत: टेक्सास प्रांतात या मांसाहारी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत या कीटकांचा उत्तरेकडे होणारा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) विशेष मोहीम जाहीर केली आहे. शेती, प्राण्यांचे आरोग्य आणि अन्न सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या विनाशकारी पशुधन कीटकाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेचे हे आतापर्यंतचे सर्वात व्यापक प्रयत्न आहेत. अमेरिकेच्या कृषी सचिव ब्रुक एल. रोलिन्स यांनी टेक्सास स्टेट कॅपिटलमध्ये गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांच्यासह या मोहिमेची घोषणा केली.
काय आहे ही जनावरे, माणसांना खाणारी अळी?
संक्रमणाची सुरुवात होताना या कीटक माश्या (मादी) जिवंत जनावरांच्या जखमेत किंवा शरीराच्या खुल्या भागात अंडी घालतात, ज्यामधून अळ्या (लार्वा) बाहेर पडतात. या अळ्या जिवंत प्राण्यांच्या मांसात घुसतात. त्या जिवंत जनावराचे मांस खातात. या अळ्या मेंदूपासून ते शरीरातील कोणत्याही अवयवात संक्रमण करू शकतात. त्यामुळे गंभीर जखमा, सेप्सिस (रक्त संक्रमण), जीवघेणा संसर्ग होऊ शकतो. पशुधन, वन्यजीव, पाळीव प्राणी आणि कधीकधी मानवांनाही हे परजीवी प्रभावित करतात, ज्यामुळे पशुपालन समुदाय, अन्न पुरवठा साखळी आणि राष्ट्रीय जैवसुरक्षेला थेट धोका निर्माण होतो.
परजीवी कीटकाचे “स्क्रूवर्म” असे नामकरण का?
या मांसाहारी परजीवीचा आकार स्क्रूसारखाच असल्याने त्याचे “न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म” (NWS) असे नामकरण करण्यात आले आहे. न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म माशा अत्यंत धोकादायक कीटक मानले जातात. टेक्सास विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. फिलिप कॉफमन यांच्या मते, ‘स्क्रूवर्म’ हे नाव त्यांच्या जखमेमध्ये आत घुसून, मांस खाण्याच्या क्रूर पद्धतीवरून पडले आहे. एखाद्या लाकडी वस्तूंमध्ये आपण ज्या पद्धतीने स्क्रू फिरवतो, अगदी तशाच पद्धतीने या माश्यांच्या अळ्या जनावरांच्या शरीरातले मांस खातात. या माश्या मृत नव्हे, तर जिवंत जनावरांचे मांस खातात. विशेषतः गाई व घोड्यांच्या ताज्या मांसावर त्या आपली उपजीविका करतात.
संक्रमणाची पाच हजाराहून अधिक प्रकरणे
सध्या मेक्सिकोत न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म संक्रमणाची पाच हजाराहून अधिक प्रकरणे नोंद झाली आहेत. गायी, कुत्रे, घोडे आणि अन्य जनावरांचा समावेश आहे. तब्बल 41 प्रकरणे माणसांमध्ये दंश झाल्याची आहेत. माणसाचे मांस खाणारा हा परजीवी पहिल्यांदाच अमेरिकेत समोर आल्याने जगभर खळबळ माजली आहे. तसेच युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशनने (सीडीसी) महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतील एका विमान प्रवाशांत तसेच जनावरांमध्ये या केसेस असल्याची कबुली दिली. सुदैवाने, यातून होणारा प्रादुर्भाव व्हायरल नसल्याने याचे एका जनावरापासून दुसऱ्यास संक्रमण होत नाही. मानवी प्रकरणातही हे संक्रमण तसे दुर्लभ आहे, परंतु त्यामुळे अत्यंत तीव्र वेदना होत असून वेळीच उपचार न झाल्यास प्राणावरही बेतू शकते.
नपंसुक नर माशांची हवेतून फवारणी
आता USDA द्वारा “न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म” परजीवीचा निपटारा करण्यासाठी टेक्सास प्रांतात अमेरिकेतील पहिला स्टराईल फ्लाय प्रॉडक्शन प्रकल्प उभारला जात आहे. इथे दर आठवड्यात 30 कोटी नपंसुक नर माशा तयार केल्या जातील. रेडीएशनने त्यांना नपंसुक बनवले जाणार आहे. नंतर या माशा विमानातून हवेत सोडल्या जातील. या माश्यांचा मादीशी संपर्क आल्यानंतर त्या अंडे देऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवले जाणार आहे. यापूर्वी 1966 मध्येही अमेरिकेने अशाच प्रकारे या माशीला संपवले होते. त्यानंतर पुन्हा 2017 मध्ये प्रकोप झाल्यानंतरही हीच पद्धत वापरण्यात आली होती. सध्या न्यू स्क्रूवर्म ही परजीवी माशी असून सध्या तिचा प्रादुर्भाव दक्षिण अमेरिका, क्युबा, हैती आणि कॅरीबियन क्षेत्रात आढळला आहे.