मुंबई : राज्यातून मान्सून माघारी गेला असला तरीही राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने (Avkali Paus) हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच स्कायमेटने देखील पुढील 24 तासांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भागातून लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वारे वाहत असून या वाऱ्यांना पश्चिमेला गती मिळाल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काय आहे स्कायमेटचा अंदाज
पुढील २४ तासांत उत्तर तामिळनाडू, रायलसीमा, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तसेच केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंडचा काही भाग, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
IMD चा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून म्हणजेच IMD कडून वर्तविण्यात आला आहे.