मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिंबक आणि इतर घटकांसाठी या प्रचलित योजनांमधून शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या योजनांचा समावेश आहे.
कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणीतून नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. मागेल त्याला शेततळे योजनेचा २०२३-२४ या वर्षात विस्तार करण्यात आला आहे. आणि आता मागेल त्याला ठिंबक/ तुषार सिंचन, फळबाग, शेटनेट, हरितगृह, शेततळे, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर आणि शेततळ्याचे अस्तरीकरण देण्यात येणार आहे.
या आहेत प्रचलित योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेतून मागेल त्याला ठिंबक/ तुषार सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मागील त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेडनेट/ हरितगृह, कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन श्रेडर.
येथे करता येईल अर्ज
कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार असून यासाठी असलेले अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे देण्यात येते. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा- डीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login अर्ज करून लाभ घेता येईल. तसेच सीएससी, ई- सेवा केंद्रांवर जाऊन शेतकरी अर्ज करू शकतात. या योजनांचा लाभ घेतांना कोणतीही अडचण आल्यास कृषी विभागाशी देखील संपर्क साधू शकतात.