मुंबई : महाराष्ट्र राज्यावर गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक संकट ओढावले आहे. उन्हाळा असूनही शेतकर्यांसह नागरिकांना कधी कडक ऊन तर कधी वादळ, वारा, पाऊस, गारपिटीचा सामना करावा लागत आहे. त्यातच हवामान तज्ज्ञांकडून राज्यात पुढील काही दिवस पावसाळ्यासारखा पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यासमोर पून्हा एकदा अवकाळीचे संकट उभे राहीले आहे.
गेल्या महिनाभरापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. उन्हाळा असूनही नागरिकांना अवकाळी पाऊस, गारपीटीचा सामना करावा लागत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या हंगामातील हातीशी आलेल्या पिकाचे नुकसान होवून शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. लवकरच हवामान सामान्य होवून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतांना पुन्हा एकदा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या इशार्यानुसार, राज्यात पुढील 10 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस कोसळणार आहे. पूर्व विदर्भात दि. 21, 22, 23, 24, 25, 26, 28 व 29 रोजी काही भागात दररोज भाग बदलत पाऊस, काही ठिकाणी वारा तर काही ठिकाणी गारपीट होईल. उत्तर महाराष्ट्रात दि.22, 26, 27, 28, 29 व 30 रोजी भाग बदलत तुरळक ठिकाणी वारा, काही भागात गारपिट तर काही ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात दि.25, 26, 28, 29, 30 रोजी भाग बदलत काही ठिकाणी गारपिट, वारा, विजांचा कडकडाटासह, पाउस होईल. दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रात दि.26, 27, 28, 29, 30 दरम्यान काही ठिकाणी गारपीट, वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. पश्चिम विदर्भात दि.25, 26, 27, 28, 29 व 30 रोजी भाग बदलत काही भागात गारपीट, वारा तर काही भागात पाऊस पडेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
थोडक्यात महत्वाचे
राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता
पूर्व आणि पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण व पश्चिम महाराष्ट्राचा समावेश
गारपीट, वादळी वार्यासह पावसाची शक्यता
पिकांसह पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन
हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना इशारा
भारतीय हवामान विभागाकडूनही काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 25 एप्रिल रोजी वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया तर 26 एप्रिल रोजी बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह काही ठिकाणी गारपीट होण्याची तसेच 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर यलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.