मुंबई : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या जून महिन्यापासून ई- पंचनामे करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
ही परिषद सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या परिषदेत उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, येणाऱ्या काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई- पंचनामे करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरीता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, यासाठी माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची मदत यावर्षापासून घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली असून आता एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता 3 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे
आता जून महिन्यापासून ई- पंचनामे होणार.
माहिती तंत्रज्ञानाची मदत घेणार.
केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार.
एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.
फ्लॅगशिप योजनांवर विचारमंथन करण्यात आले.
मिशन-2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे लोकार्पण करण्यात येणार.
तीव्र उष्णता, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होत असेलेल नुकसान हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री शिंदे परिषदेत म्हणाले. मदत व पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळातही आपण सर्वांनी दक्ष राहून आवश्यक ती खबरदारी घेऊन आपले काम जवाबदारीने करावे, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.