कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी पुण्यातील सिमेंटच्या रानात स्ट्रॉबेरी पिकवत असून गुंतवणुकीच्या दुप्पट उत्पन्न कमावत आहेत. विद्यार्थ्यांनी 20 गुंठे जमिनीतून 3 टन स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं आहे. त्यातून गेल्या दोन महिन्यांत ₹ 4 लाखांहून अधिक कमाई केली आहे.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच स्ट्रॉबेरीची लागवड केली गेली आहे. त्यातून पुण्यात पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जात आहे. अनुभवावर आधारित शिक्षणाचा भाग म्हणून, कृषी पदवीधरांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देश त्यामागं आहे.
स्वीट सेन्सेशन, ब्रिलियंस, एलियाना, विंटर डॉन आणि ब्युटी या स्ट्रॉबेरीच्या पाच वाणांची ऑक्टोबर 2023 मध्ये लागवड करण्यात आली. महाविद्यालयानं यावर सुमारे 2 लाख रुपये खर्च केले. लागवडीपासून कापणी आणि विक्री व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे B.Sc च्या शेवटच्या वर्षातील सुमारे 80 विद्यार्थी करत असल्याचं या प्रकल्पाचे प्रमुख प्रा. सुभाष भालेकर यांनी सांगितलं.
या स्ट्रॉबेरीची काढणी जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आली. प्रत्येक झाडाला सुमारे 15 ते 20 फळं आली, त्यांचं सरासरी वजन 25 ते 30 ग्रॅम इतकं भराल. म्हणजेच सरासरी फळ उत्पादन प्रति झाड 350 ते 450 ग्रॅम होतं. दररोज सुमारे 40 ते 50 किलो स्ट्रॉबेरीची कापणी केली जात होती. त्यातून दररोज 12,000 ते 15,000 रुपये उत्पन्न मिळत होतं.
या विद्यार्थ्यांनी पुण्यातही स्ट्रॉबेरीची लागवड शक्य असल्याचं सिद्ध केलं आहे. स्ट्रॉबेरी हे संवेदनशील पीक असून योग्य व्यवस्थापन व काळजी घेतल्यास त्याचं उत्पादन घेणं निश्चितच शक्य आहे. यासाठी लागवडीची योग्य वेळ महत्त्वाची आहे. पुणे कृषी महाविद्यालय आता पुढे जाऊन ब्लूबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीचीही शेती करणार आहे.