मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्यानंतर केंद्राने देखील नुकसान भरपाई घोषित करुन प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरवात केली आहे. नेमकी नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर कशी जमा होईल, हे माहीत असणे आवश्यक आहे. ऐन दिवाळी सणात ही मदत मिळत असल्याने पीक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
खरिपातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकर्यांना नुकसान भरपाईचा मोठा आधार होतो. राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याची रक्कम जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारनेही पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रुपये विमा कंपन्यांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरिपातील पिकांच्या नुकसानीपोटीची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पावसामुळे पिकांचे तर नुकसान झाले होते. शिवाय उत्पादीत झालेल्या मालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नव्हता. दिवसेंदिवस सोयाबीनचे दर घसरत होते. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी आणि दिवाळीसाठी ही नुकसानभरपाईची मदत शेतकर्यांच्या कामी येणार आहे.
केंद्राचा 899 कोटींचा पहिला हप्ता
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडील विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे केव्हा वर्ग होणार, याची उत्सुकता शेतकर्यांना होती. अखेर 899 कोटी रुपयांचा हप्ता सहा विमा कंपन्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शेतकर्यांना या रकमेचा आधार मिळणार आहे. हा पहिलाच हप्ता असून विमा भरलेल्या प्रत्येक शेतकर्यांना याचा लाभ मिळेलच असे नाही. तर कोणत्या जिल्ह्यासाठी ही रक्कम अदा करायची यावर विमा कंपन्या विचारधीन आहेत. मात्र, रखडलेला केंद्राकडील हप्ता विमा कंपन्याना मिळाल्याने मदतीचा मार्ग सुखकर झाला आहे.
8.4 लाख शेतकर्यांचे प्रस्ताव मान्य
खरीप हंगामातील पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकर्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनांची संख्या 34.52 लाख झाली आहे. यातील 8.4 लाख शेतकर्यांच्या दाव्यांचे प्रस्ताव आतापर्यंत मान्य करण्यात आलेले आहे. अद्यापही लाखो शेतकर्यांच्या पूर्वसूचनांवर पंचनामे होण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. मात्र, कृषी आयुक्तांनी याचा आढावा घेतला असून लवकरच भरपाईचा लाभ शेतकर्यांना देण्याबाबत सूचना केल्या आहेत.
असा दिला गेला विमा कंपन्यांना निधी
रिलायन्स 165.58 कोटी
इफ्को 161.99 कोटी
एचडीएफसी 116.20 कोटी
भारती एक्सा 92.24 कोटी
बजाज अलायन्स 107.62 कोटी
भारतीय कृषी विमा कंपनी 254.92 कोटी
राज्य सरकारचा 993 कोटींचा हप्ता
राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची घोषणा केलेली आहे. तर विमा कंपन्यांना पहिला हप्ता म्हणून 993 कोटी रुपये अदा केले आहेत. राज्य सरकारने पैसे अदा करुनही केंद्र सरकारचा हप्ता वर्ग न झाल्याने प्रक्रिया रखडली होती. अखेर केंद्रानेही आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता वर्ग केला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी काही जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे संकेत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देले आहेत. शिवाय केंद्राकडील निधीसाठी पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
शेतकर्यांनी ही काळजी घ्या
नुकसानभरपाई जमा होणार म्हणजे नेमकी कुठे? हा प्रश्न अनेक शेतकर्यांना पडलेला असतो. मात्र, शेतकर्यांनो ही रक्कम तुम्ही पीक विमा भरताना ज्या बँकेचा खाते क्रमांक फॅार्मवर दिलेला आहे त्याच खात्यावर जमा होणार आहे. शिवाय तुम्ही दिलेल्या मोबाईलवर क्रमांकावर तसा मॅसेजही येणार आहे. ही रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी सांगितले.
Hi
Pik vima