प्रतिनिधी/ मुंबई
कोकण, कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह मुंबईत सर्वांची दैना उडविणाऱ्या मान्सूनला पोषक कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात पुन्हा तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर कुलाबा वेधशाळेने कोकणासह कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या नुकसानिची पाहणी सुरु असतांनाच या नवीन अंदाजाने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.
कोकणात अतिवृष्टीने दरडी कोसळल्या व शेकडो बळी गेले. यास कारणीभूत ठरला तो त्या वेळी अरबी समुद्रात कोकण किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा. असाच पट्टा आता अरबी समुद्रात तयार झाला आहे. परिणामी सातारा कोल्हापूरसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने दिली आहे. गेल्या आठवड्यात २२ ते २४ जुलै या काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्या नुकसानीचे पंचनामे सुरु असतानांच हा नवीन हवामान अंदाज आला आहे.
कोकणास समांतर दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आहे. परिणामी कोकण किनारपट्टी तसेच कोल्हापूर, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे जिल्ह्यांतील घाट भागात २९ जुलै ते एक ऑगस्ट या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे.