मागील आठवड्यात खऱ्या अर्थाने श्रावणझडीची अनुभव देणारा मान्सून आता आपला मुक्काम अजून ४-५ दिवस वाढविण्याची शक्यता आहे. संततधार पावसाने बऱ्याच ठिकाणी भाजीपाला, कापूस व कडधान्य पिकांचे नुकसान होत असतांना हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
का वाढला पावसाचा मुक्काम ?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. या क्षेत्रांची तीव्रता गुरुवारपासून ते रविवारपर्यंत राहणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक भागात अतिवृष्टी, घाटमाथ्यावर जोरदार तर मध्यम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.
गुजरातच्या दक्षिण भागात असलेलया चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच छत्तीसगडच्या उत्तर भाग व परिसर आणि मध्य प्रदेशाच्या ईशान्य भाग, उत्तरप्रदेशाच्या नैऋत्य भागापर्यत कमी दाबाचे क्षेत्र आहे. उत्तर प्रदेशाच्या परिसरात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय मॉन्सूनचा पट्टा बंगालचा उपसागराचा वायव्य भागापर्यंत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस होत आहे.
दोन दिवस ऊन सावलीचा खेळ !
दरम्यान आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागात पावसाची उघडीप राहणार आहे. पण काही भागात अधून मधून हलक्या सरी कोसळतील. बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहणार आहे. कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे.