मागील ४ दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान असून वातावरणात किडीसाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकावर याचा अनिष्ट परिणाम होत आहे. या वर्षी पाऊसमान चांगले असल्याकारणाने गहू, ज्वारी, मक्का, या प्रमुख रब्बीच्या पिकासह केळी व कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा हे पिकांच्या वाढीस कारणीभूत घटक असतात, परंतु काही दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरण व अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे घाटे अळीचे(हेलीकोव्हप्रा आर्मिजेरा) प्रमाण वाढले असून इतर किडीही प्रबळ झाल्या आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या रब्बीच्या पिकावर परिणाम होऊन पिक वाढ थांबून पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अळी लहान असतांनाच हेलीओकील ५०० मिली. ५०० ली. पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे किंवा क्विनॉलफॉस २ मिली प्रती ली. पाण्यात मिसळून फवारावे, अळी मोठ्या अवस्थेत असेल तर रॅनॅक्झीपार २ मिली प्रती १० ली. पाण्यात मिसळून फवारावे. प्रामुख्याने फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. ढगाळ वातावरणासह दाट धुक्यामुळे हरबरा व इतर पिकांची फुलगळ होऊ शकते. अशा परिस्थिती पिकाला तुषार सिंचनाने पाणी दिल्यास किंवा फवारणी केल्यास पिकावरील धुके निघून नुकसान टाळणे शक्य होते. त्याचबरोबर केळी पिकवर करप्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.
शेतकर्यांनी आंबा बागामध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 7.5 टक्के प्रवाही 2 मि. ली. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझोल 5 टक्के 5 मि. ली. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रँम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे, झाडावरील कैरी मोठी झाली असल्यास पालापाचोळयाची धुरी करावी, जेणेकरुन आंबा पिकावरील नुकसान टाळता येईल. शेतात भाजीपाला वांगी, टोमॅटो व मिरची पिकामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकोनझोल 5 मि. ली.80 टक्के पाण्यात मिसळणारा गंधक 20 ग्रँम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे
विविध अळीसाठी खालीलप्रमाणे फवारणी करावी
घाटे अळी – क्लोरअट्रॉनीलीप्रोल (२० एसी)२.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट
लष्करी अळी –क्लोरपायरीफॉस(२० इसी) २०मिलि प्रती ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने पोखरणारी अळी- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा –डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा रोगर वापरावे
याप्रमाणे फवारणी वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावानुसार करावी.
मधुकर चौधरी
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद ,जळगांव