मुंबई – इस्रोच्या इन्सॅट-3डीआर आणि 3डीएस या उपग्रहांच्या ताज्या छायाचित्रांवरून, देशाच्या आकाशावर सर्वदूर पावसाच्या ढगांची गर्दी दिसत आहे. एल-निनो संपूर्ण मोसमाचा मुख्य कल ठरवत असला, तरी स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती (सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स)सारख्या अल्पकालीन यंत्रणा काही दिवसांसाठी मान्सूनला पुन्हा शक्तिशाली बनवतात. देशातही सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी 5 सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स निर्माण झाले आहेत. यामुळे देशातील मान्सूनची ‘द्रोणी रेषा’ (ट्रफ) पुन्हा सक्रिय झाली आहे. या हवामान प्रणालीचा थेट प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. या यंत्रणेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होणार आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढगांची मोठी साखळी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे.
‘एल-निनो’मुळे प्रशांत महासागरातील तापमान वाढून संपूर्ण मान्सून मोसमावर विपरीत परिणाम होतो आणि पाऊस कमी पडतो. मात्र, सध्या 5 चक्रीय प्रणाली एकत्र आल्याने ‘एल-निनो’च्या चिंतेदरम्यानही महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात मान्सूनचा हा टप्पा अत्यंत सक्रिय आणि समाधानकारक ठरत आहे.
येत्या आठवडाभरात महाराष्ट्रातील पावसाची स्थिती
कोकण आणि गोवा: कोकण किनारपट्टीच्या भागात, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार सरी कोसळू शकतात.
मध्य महाराष्ट्र व गुजरात लगतचा भाग: मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि गुजरात सीमेलगतच्या भागात पावसाचा जोर चांगला राहील.
विदर्भ आणि मराठवाडा: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून असलेल्या विदर्भातील भागात चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी आज, 23 जुलै रोजी महाराष्ट्रासाठी पावसाचा सुधारीत अंदाज वर्तवला आहे. राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून, तब्बल 24 हून अधिक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाने मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण राज्यात आज मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
आजच्या हवामानाचे मुख्य अपडेट्स
पुणे आणि घाटमाथा (रेड अलर्ट): हवामान विभागाने पुण्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता असून, दरड कोसळण्याचा आणि पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याच्या मुख्य शहरातही पावसाचा जोर राहील.
मुंबई, ठाणे आणि कोकण (ऑरेंज व यलो अलर्ट): मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आज जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र, मुंबईला लागून असलेल्या ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. किनारपट्टीच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
नागपूर आणि संपूर्ण विदर्भ (यलो अलर्ट): पूर्व महाराष्ट्र आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज असून या सर्व जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
इतर भाग: उत्तर महाराष्ट्र (नाशिक घाटमाथा) आणि कोल्हापूर-सातारा येथील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. खान्देश, मराठवाड्यात पावसाचा जोर थोडा कमी राहील, मात्र तेथेही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. गुजरातलगतच्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पावसाचा जोर वाढू शकतो.
आजचे पावसाचे अलर्ट
- मुसळधार पावसाची शक्यता (रेड अलर्ट): पुणे घाटमाथा, कोकण घाटमाथा, पालघर
- अतिजोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट): रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा.
- जोरदार पावसाची शक्यता (यलो अलर्ट): मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
- विजांसह वादळी पावसाची शक्यता (यलो अलर्ट): नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी शेतातील पिके कोमेजण्याच्या स्थितीत पोहोचली होती. मात्र, सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीत पुन्हा ओलावा निर्माण झाल्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात समाधानाचं वातावरण असून वेळेवर झालेला पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल














