नाशिक : ग्रामसंस्कृतीचा दुवा जपून ठेवल्यास राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी असल्याचं राज्य कृषी व सहकारी ग्रामीण महासंघाचे (मार्ट) अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितले. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत गार्डनमध्ये कृषी पर्यटन महोत्सवांतर्गत आयोजित ‘कृषी पर्यटन आणि बदलती जीवनशैली’ या विषयावरील चर्चासत्र तसेच ‘बसवंत कृषी पर्यटन पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एम.टी.डी.सी.चे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक विभागाच्या पर्यटन अधिकारी यामिनी मुंडावरे, पुणे स्थित सी.बी.आर.टी.आय.चे माजी विकास अधिकारी डॉ. धनंजय वाखले, ज्येष्ठ सनदी लेखापाल राजाराम बस्ते हे विशेष निमंत्रित होते.
कृषी पर्यटन ही संकल्पना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुजते आहे. त्या दृष्टीने आपल्या राज्यात सुवर्णसंधी असून सर्वतोपरी अनुकूलता आहे. मात्र या व्यवसायाला केवळ रिसॉर्टचे विलासी स्वरूप न येता, ग्रामसंस्कृतीशी निगडित असलेला त्याचा मूळ गाभा टिकून राहावा, यासाठी त्याची मूलतत्त्वे जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय बसवंत गार्डन मध्ये दिसून आल्याचे प्रतिपादन बाळासाहेब बराटे यांनी केले. बराटे पुढे म्हणाले की, हा व्यवसाय अनेक कारणांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. अशा केंद्रांवर दर्जेदार भोजन, उत्तम निवासी सोयी उपलब्ध करून दिल्यास देशातीलच नवे तर विदेशी पर्यटकही भेटी देतील. या व्यवसायाला शासनाने पोर्टल्स, विपणन व्यवस्था यांसह विविध योजनांद्वारे प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. ‘मार्ट’ या आमच्या सहकारी संघटनेच्या माध्यमातून, कृषी पर्यटन केंद्रांवर शासकीय शिबिरे, उपक्रम आयोजिले पाहिजेत असे आम्ही सुचवले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी आपल्या भाषणात बसवंत गार्डनच्या कृषी पर्यटन पुरस्कार विषयक उपक्रमाची मनःपूर्वक प्रशंसा केली. महाराष्ट्रात त्यातही प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब पिकांची शेती मोठ्या प्रमाणात होते. या परिसराची ओळख आता वाईन कॅपिटल म्हणूनही होते आहे. या अनुकूलतेचा शेतकऱ्यांनी कल्पकतेने लाभ घ्यावा. विविध सुविधांसह आपल्या शिवारात कृषी पर्यटन केंद्र उभारल्यास त्यांना उत्तम अर्थलाभ होईल. शहरी नागरिकांना याद्वारे ग्रामजीवनाची ओळख देखिल होईल. घटकाभर आनंद आणि निवांतपणाच्या शोधात असलेल्या पर्यटकांना सतत नित्य नवे काही देण्याचा प्रयत्न मात्र अवश्य केला पाहिजे, असा अभिप्रायही त्यांनी व्यक्त केला. जगदीश चव्हाण यांनीही कृषीपूरक उद्योग म्हणून या प्रकारच्या पर्यटनाला आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीनझोन ॲग्रोकेमचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी केले. ते म्हणाले की, शेतकरी आणि पर्यटन क्षेत्र यांचे अतिशय जवळचे नाते आहे. कृषी निविष्ठा उद्योगाशी निगडित असलेल्या आमच्या मूळच्या पूर्वा परिवाराची बसवंत गार्डन ही एक हरित शाखा म्हटली पाहिजे. हे लक्षात घेता, या माध्यमातून या दोघांमधला दुवा म्हणून काम करण्याची आमची संकल्पना आहे. कृषी पर्यटन व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यामागे या विविध ठिकाणच्या केंद्रांची परस्परांना तसेच पर्यटनप्रेमी नागरिकांना माहिती करून देण्याची आमची भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी.बी. तथा अण्णासाहेब पवार, ग्रीनझोनचे ॲग्रोकेमचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड, सी.बी.आर. टी.आय.चे माजी विकास अधिकारी डॉ. धनंजय वाखले आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कृषी पर्यटन पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. चंद्रशेखर भडसावळे (सगुणा बाग, जि. रायगड), मनोज हाडवळे (पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, जि. पुणे), पद्मा बाळासाहेब देवरे व अंजना केवळ देवरे (शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र, जि. नाशिक), चैतन्य कुलकर्णी (अगत्य अॅग्रो टुरिझम, जि. अहमदनगर), श्रीकांत वाघ (एस.एस. फार्म, चौगाव, ता. सटाणा, जि. नाशिक), आदित्य प्रभाकर सावे (सावे फार्म, जि. पालघर), प्रतिभाताई सानप (सृष्टी अॅग्रो टुरिझम, छत्रपती संभाजीनगर), विजय देठे (राधाकुंज नेचर केअर कृषी पर्यटन केंद्र, जि. बुलढाणा), श्रीकांत चव्हाण (रानफुला अॅग्रो टुरिझम अॅन्ड अॅडव्हेंचर, जि. पुणे), अभिलाष संतोषकुमार नागला (नंदग्राम गोधाम, गौ आणि कृषी पर्यटन केंद्र अंजाळे, यावल, जि. जळगाव), हरिराम देवराम थविल (रानझोपडी अॅग्रो टुरिझम, जि. नाशिक), राजू भंडारकवठेकर (अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र, जि. सोलापूर) हे पुरस्कारांचे मानकरी ठरले. याच कार्यक्रमात मिलांज आंबा महोत्सवांतर्गत आयोजित स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
बसवंत कृषी पर्यटन चर्चासत्र तसेच बसवंत आंबा महोत्सवाला प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव आणि पर्यटनप्रेमींचा लक्षणीय प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रीनझोन अॅग्रोकेमचे संचालक विजय पवार, सुहास कदम, महेश पाटील, प्रकल्प समन्वयक संदीप सोनवणे तसेच राजेंद्र बागूल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आभार बसवंत गार्डनचे प्रकल्प संचालक संदीप वाघ यांनी मानले. सूत्र संचलन मानव संसाधन विभागाचे रुपेश ठाकरे यांनी केले.