चटणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शेंगदाणा चटणी हा एकमेव प्रकार. पण आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खुसखुशीत लसणाची चटणी. या लसणाच्या चटणीची खासियत अशी की ही चटणी कमीत कमी सहा महिने टिकते. या चटणीत लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे ही चटणी चवीला देखील झणझणीत लागते. प्रवासामध्ये भाकरी किंवा पोळी सोबत ही चटणी घेऊन जाणे सहज शक्य होते.
लसणाची चटणी ही आरोग्यासाठी देखील उपयुक्त असते. कारण लसूण हा B आणि C जीवनसत्वाचा चांगला स्त्रोत आहे. सोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी देखील लसणाची मोलाची भूमिका असते. सोबतच पचनक्रिया देखील सुधारते. कॅन्सर ब्लड प्रेशर आणि हाडांच्या समस्यांसाठी देखील लसूण हा पदार्थ खूप उपयोगी आहे.
पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती
लसणाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य
अर्धी पळी तेल, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा धने, पाच ते सहा बेडगी मिरच्या, अर्धा चमचा जिरं, तीन चमचे दाळवे, तीन चमचे पांढरे तीळ, एक वाटी सुकं खोबरं, अर्धा चमचा हळद, तीन चमचे काश्मिरी मिरची पावडर, चवीपुरते मीठ, लसणाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य लसणाच्या चटणीसाठी आवश्यक आहे.
अशी बनवा लसणाची चटणी
सुरुवातीला घरातली एखादी लोखंडाची किंवा स्टीलची जाड कढई घ्यावी. जाड भांड असल्यामुळे त्यातील जिन्नस जळत किंवा करपत नाहीत. कढई गरम केल्यावर त्यात अर्धी पळी तेल टाकावे. नंतर मोहरी घालून धने आणि बेडगी मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून तेलात टाकावेत. आणि नंतर जिरं टाकून सगळे जिन्नस मंद आचेवर तीन ते चार मिनिटे सुगंध येईपर्यंत परतून घ्यावीत. चटणीमध्ये दाळवं घातल्यामुळे चटणी सुटसुटीत होते. चटणी मध्ये दाळवं घातल्यानंतर तिळाचा समावेश करावा. परत एकदा हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावेत. मंद आचेवर मसाले भाजून घेतल्यावर एक वाटी सुकं खोबरं त्यात मिश्रित करावे. आणि खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत त्याला व्यवस्थित ढवळून घ्यावे. नंतर अर्धा चमचा हळद व तीन चमचे कश्मीरी मिरचीची पावडर त्यात मिसळून घ्यावी.
कश्मीरी मिरचीच्या पावडरमुळे चटणीला लालसर रंग येतो. नंतर चवीनुसार मीठ घालावे. आणि सर्वात शेवटी 50 लसणाच्या पाकळ्या सालासकट तयार झालेल्या मसाल्यामध्ये घालाव्यात. ही चटणी साठवणीची असल्यामुळे एका मोठ्या ताटात लसणाच्या पाकळ्या पसरून घ्याव्यात. चटणी बनवण्याच्या पाच-सहा तासांपूर्वीच लसणाच्या पाकळ्या मोकळ्या हवेत पसरून ठेवाव्यात. जेणेकरून लसणातील पाण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे बुरशी पासून आणि चटणी खराब होण्यापासून त्याचे रक्षण होईल. मसाल्यामध्ये लसूण घालून वर खाली करून मिश्रित करून घ्यावा. लसुन घातल्यावर चटणीला परत भाजण्याची गरज नाही. तयार झालेला मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यावा. तर आता तयार आहे खुसखुशीत लसणाची चटणी.