अधिक दूध मिळवण्यासाठी पशुपालक गायी-म्हशींना ऑक्सिटोसिन इंजेक्शन टोचत असल्याचं प्रकरण न्यायालयात गेलं आहे. यासंबंधी दाखल याचिकेवर आले पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय तसंच भारतीय पशु कल्याण मंडळाकडूनही जवाब मागवण्यात आला आहे.
याचिकाकर्ते जयरूप आणि इश्विता यांनी चंदीगडमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दाखल केला आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेली सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अधिक दूध निर्माण करण्यासाठी जनावरांना ऑक्सिटोसिनची लस दिली जात आहे. बहुतेक दुग्ध उत्पादक शेतकरी ही लस स्वतः देतात आणि तीच सिरिंज पुन्हा पुन्हा वापरली जाते.
ही लस केवळ जनावरांसाठीच हानीकारक नाही, तर तिचं सेवन केल्यानंतर काढलेलं दूध पिणाऱ्यांचं आरोग्य बिघडवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.