शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ई-केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नसेल, तर ती लवकरात लवकर करून घ्या. कारण, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले असेल त्यांनाच पीएम-किसानचा 17 वा हप्ता आणि पुढचे सर्व लाभ मिळणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे 16 हप्ते जारी केले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 वा हप्ता जारी केला होता.
आता शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. केंद्र सरकार 17 व्या हप्त्याची रक्कम जून किंवा जुलै महिन्यात जारी करू शकते, अशी सूत्रांनी माहिती आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या 17व्या हप्त्याचा लाभ केवळ ई-केवायसी पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलं नसेल, तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या आपलं सरकार सीएससी केंद्रातून करून घेऊ शकता. तिकडे जाताना तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्या. याशिवाय, अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुम्ही घरबसल्याही ई-केवायसी करू शकता.