केंद्र सरकारकडून ‘भारत’ लेबलखाली स्वस्त दरात तांदळाचे वितरण वाढविण्यात आले आहे. याशिवाय, सरकारने व्यापाऱ्यांना दर शुक्रवारी तांदळाचा साठा जाहीर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे एका महिन्यात गैर-बासमती तांदळाच्या किमती 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन आणि रिटेल चेन केंद्रीय भंडार यांच्यामार्फत भारत तांदूळ 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये 29 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
वाढत्या महागाईमुळे जुलै 2023 मध्ये, सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी तसेच 20% निर्यात शुल्क लादले होते. गेल्या महिनाभरात जागतिक बाजारातील भारतीय बासमती तांदळाच्या किमती 100-200 डॉलर प्रति टनने घसरल्या आहेत. आता मागणी कमी आहे.
निवडणूक काळात केंद्र सरकारकडून कठोर निर्णयांची व्यापाऱ्यांना भीती असल्याने खुल्या बाजारातील तांदूळ दरात घसरण होत आहे. 65 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या सुगंधी गोविंदभोग तांदळाची किंमत घाऊक स्तरावर 55 रुपये किलोपर्यंत घसरली आहे. कमी निर्यात मागणी आणि मुबलक पुरवठा यामुळे तांदळाच्या किमती कमी होत आहेत.