भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई-पुणेसह राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासांत पावसाची हजेरी पुन्हा पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भात गारपीट होण्याची शक्यता
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली असून, त्यामुळे रब्बी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शासनाने लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
“या” जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा तडाखा
येत्या 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे धुमशान राहण्याची भीती आहे. कोकण, मुंबई, पुण्यासह, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. सोलापूर, जालना, बीड आणि उस्मानाबाद मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची संभावना वर्तवली गेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर मध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी येत्या 24 ते 48 तासांत गारा, वारा-वादळ, विजांच्या कडकडाटीसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान काही ठिकाणी थंडगार हवा सुटू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇