भुईमूग हे तीनही हंगामात घेतले जाणारे तेलबिया पिक आहे. उन्हाळ्यात तुलेनेने कमी क्षेत्र असूनही या कालावधीत असणारे निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने प्रति एकरी सरासरी उत्पादकता अधिक आहे. भुईमूग या पिकापासून जनावरांना सकस चारा, खाद्यतेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की), सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळत असल्याने हे एक फायदेशीर पीक आहे.
जमीन
भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. भारी व चिकणमातीयुक्त जमिनीत आऱ्या खोलवर जात नाहीत, शेंगा पोसत नाहीत. तसेच काढणीच्या वेळी ओलावा कमी असल्यास शेंगा जमिनीतच राहून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
हवामान
भुईमूग पिकवाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान उपयुक्त असते. बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीसाठी जमिनीतील तापमान 15 अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. फुलधारणेसाठी वातावरणातील तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअस तापमान मानवते.
वातावरणातील तापमान सतत 33 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास पराग कणांच्या सजीव क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन फुलांमध्ये वांझपणा येऊन शेंगधारणा होत नाही. तर जमिनीतील तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअसमध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फूलधारणा ते पक्वता या कालावधीत जमीन व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्या संख्येत घट होते.
पूर्वमशागत
भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोल नांगरट करावी. जास्त खोल नांगरणी करणे टाळावे. कारण जास्त खोल नांगरणीमुळे जमिनीच्या खोल थरांमध्ये शेंगा तयार होतात. त्यामुळे शेंगाची काढणी अवघड बनते. नांगरटीनंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर एकरी 2 ते 3 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरवून घ्यावे.
पेरणीची वेळ
उन्हाळी भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी. पेरणीस उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते. रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावर पेरणीस सुरुवात करावी.
बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
पेरणीसाठी एकरी साधारणपणे 40 ते 50 किलो बियाणे पुरेसे होते. बियाण्याचे प्रमाण ठरविताना निवडलेला वाण, एकरी रोपांची संख्या, बियाण्याचे 100 दाण्याचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर इत्यादी बाबींचा विचार करावा.
• फुले उन्नती, एस.बी.-11 टीएजी-24 व टीजी-26 या उपट्या वाणाचे 40 किलो बियाणे वापरावे.
• टीपीजी-41, जेएल-776, जेएल-501 या वाणाचे 48 ते 50 किलो तर निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी 32 ते 34 किलो बियाणे प्रति एकरी वापरावे.
• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास, थायरम 5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
• त्यानंतर रायझोबिअम 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.
सुधारित जाती
भुईमूग पेरणीसाठी सुधारित जातीच्या दर्जेदार, प्रमाणित किंवा सत्यप्रत बियाण्याची निवड करावी.
वाण – कालावधी (दिवस) – सरासरी उत्पादन (क्विं/एकर) – वैशिष्ट्ये
1. फुले उन्नती – 120 ते 125 — 12 ते 14
{उपटा वाण, लाल दाणे, तेलाचे प्रमाण 52%, स्पोडोप्टेरा अळी, तांबेरा, पानांवरील ठिपके, खोडकुज रोगास मध्यम प्रतिकारक, पाण्याच्या ताणास सहनशील}
2..एसबी 11 – 115 ते 120 – 6 ते 8
{उपटा वाण, पाण्याच्या ताणास सहनशील, तेलाचे प्रमाण 48.22%}
3. जेएल 501 – 110 ते 115 – 12 ते 13
{उपटा वाण, तेलाचे प्रमाण 49%, अफ्लाटॉक्सिन दूषितीकरणास सहनशील}
4. टीएजी 24 – 110 ते 115 – 10 ते 12 {उपटा वाण}
5. टीजी 26 – 110 ते 115 — 10 ते 12
{उपटा वाण, 15 दिवसांची सुप्तावस्था}
6. जेएल 776 (फुले भारती) – 115 ते 120 – 12 ते 14 {उपटा वाण}
7. जेएल 286 (फुले उनप) – 90 ते 95 – 8 ते 10
{उपटा वाण, मूळकुज सहनशील, तेलाचे प्रमाण 49-50%}
8. टीपीजी 41 – 125 ते 130 – 10 ते 12
{जाड दाण्याचा उपटा वाण, तेलाचे प्रमाण 48%, गुलाबी लाल दाणे, अफ्लाटॉक्सिन दूषितीकरणसाठी उच्च सहनशीलता}
9. केडीजी 160 (फुले चैतन्य) – 105 ते 110 – 8 ते 10
{उपटा वाण, खोडकुज, पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक, मध्यम टपोरे दाणे, तेलाचे प्रमाण 51.6%}
10..टीएलजी 45 – 115 ते 120 – 8 ते 10
{उपट्या, टपोऱ्या दाण्याचा निर्यातक्षम वाण, तेलाचे प्रमाण 51%}
11. एलजीएन 1 – 105 ते 110 – 7 ते 8
{उपट्या, लवकर तयार होणारा, पाण्याचा ताण सहन करणारा वाण}
पेरणी पद्धत
दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 10 सें.मी. ठेवावे. जेणेकरून एकरी योग्य रोपांची संख्या राखली जाईल. टोकण पद्धतीने योग्य अंतरावर पेरणी केल्यास 25 टक्के बियाणे कमी लागते आणि उगवण चांगली होते. बियाण्याची पेरणी 2 ते 5 सें.मी. खोलीवर करावी. जास्त खोल पेरणी करू नये.
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत एकरी 4 टन प्रमाणे कुळवाच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळावे.
• एकरी नत्र 10 किलो व स्फुरद 20 किलो द्यावे.
• अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांसोबत जिप्सम 160 किलो (पेरणीवेळी 80 किलो, तर उर्वरित 80 किलो आऱ्या सुटताना) प्रति एकर प्रमाणे द्यावे. त्यामुळे आऱ्या जमिनीत सुलभरीत्या जाण्यास तसेच शेंगा पोसण्यास मदत होते.
• ठिबकद्वारे खते द्यायची असल्यास, शिफारशीत खत मात्रेच्या 100 टक्के खते (10:20:00 नत्र, स्फुरद, पालाश किलो प्रति एकर) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून 9 समान हप्त्यांत विभागून द्यावीत.
आंतरमशागत
लागवडीनंतर 45 दिवसांपर्यंत दोनवेळा खुरपण्या करून पीक ताणविरहित ठेवावे. 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. आऱ्या सुटू लागल्यानंतर (35 ते 40 दिवस) आंतरमशागतीची कामे करू नयेत. फक्त मोठी तणे उपटून टाकावीत.
तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करायचा असल्यास, पेरणीनंतर दोन दिवसांच्या आत योग्य ओलीवर पेंडीमिथॅलिन (उगवणपूर्व) 1 लिटर 200 लिटर पाण्यातून प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
• पेरणीनंतर 20 दिवसांनी तण उगवणीनंतर इमॅझेथॅपीर (10 एसएल) 300 मिलि 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी भुईमुगासाठी 28 ते 32 सें.मी. पाणी लागते. लागवडीसाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्रामुळे 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होते.
• पेरणीनंतर 4 ते 5 दिवसांनी आंबवणीचे पहिले पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 10 ते 12 वेळा पाळ्या द्याव्यात. आऱ्या जमिनीत घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
• भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते. तसेच पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन वाढीसाठी उपयुक्त ठरते.
वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन
पिकाची अवस्था – पेरणीनंतर पाण्याच्या पाळ्या (दिवस)
1. उगवणीच्या वेळी पेरणीनंतर लगेच फुलोरा येणे – 30 ते 40 दिवस
2. आऱ्या सुटण्याची अवस्था – 40 ते 45 दिवस
3. शेंगा धरणे व दाणे भरणे – 65 ते 70 दिवस
काढणी
भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण 8 ते 9 टक्क्यांपर्यंत खाली आणावे. सुधारित पद्धतीने भुईमुगाची लागवड व नियोजन केल्यास सुधारित वाणांचे एकरी 12-१14 क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच 1.5 ते 2 टन कोरड्या पाल्याचे उत्पादन मिळू शकते.
संतोष करंजे,
विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), कृषी विज्ञान केंद्र बारामती
{कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री}