मुंबई : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा करते. ही रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना देण्यात येते. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. या योजनेमुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.15) रोजी भाऊबीजच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. या योजनेचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान बटण दाबून हा हप्ता हस्तांतरित केला. केंद्र सरकारने यापूर्वी 27 जुलै रोजी 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला. या योजनेतंर्गत प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या जमा करण्यात येतात.
हे काम करा, अन्यथा..
तुम्ही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे अन्यथा, तुमच्या खात्यात पैसे पाठविले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये लिंग चूक, नावाची चूक, आधार क्रमांक इ. कोणतीही चूक आढळल्यास हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत. दरम्यान, या योजनेशी संबंधित माहिती हवी असल्यास [email protected] वर तुम्ही ईमेल पाठवू शकता. तसेच 1555261 किंवा 1800115526 या हेल्पलाइन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात.
अशी तपासा लाभार्थी यादी
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. पीएम किसान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे बघण्यासाठी http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील द्या. यानंतर पीएम किसानची यादीसमोर येईल. त्यात तुमचे नाव असेल तर हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.
15 व्या हप्त्याचे स्टेट्स असे तपासा
सर्वात अगोदर http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा. या ठिकाणी तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ दिसेल त्यावर क्लिक करून ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा. यानंतर येथे तुम्हाला आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे तुम्हाला कळेल.