उत्तम नियोजनाने, अभ्यासपूर्वक, परिश्रमाने शेती केली तर आज कोणाताही उद्योग व्यवसायापेक्षा शेती काही कमी नाही. बिहारमधील तीन मित्रांनी हे दाखवून दिले आहे. या तिघांनी बँकेची नोकरी सोडून एक शेतजमीन भाड्याने घेतली. आधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला पिकवून ते आता वर्षाला एक कोटींची कमाई करत आहेत. या तीन मित्रांची ही प्रेरणादायी यशोगाथा.
देशातील अनेक शेतकरी आज शेतीतून लाखो नव्हे तर करोडो रुपये कमावत आहेत. यासाठी पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने फळे, फुले, भाजीपाल्याची लागवड करत आहेत. यामुळेच आता हळूहळू शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. अनेक सुशिक्षित तरुणही शेतीत रस घेत आहेत. अशाच तीन मित्रांची ही कहाणी, जे भाड्याने जमीन घेऊन भाजीपाला पिकवता आहेत. यातून त्यांची बंपर कमाई होत आहे. आता तर ते इतरांनाही रोजगार पुरवत आहेत. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील हे तिघे रहिवासी आहेत. पाटण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिहटा येथे भाडेतत्त्वावर जमीन घेऊन ते भाजीपाला पिकवत आहेत. विनय राय, राजीव रंजन शर्मा आणि रणजीत मिश्रा अशी या तरुण शेतकर्यांची नावे आहेत.
मित्रांचे हे त्रिकूट भाजीपाला विकून दरवर्षी 50 लाखांचा निव्वळ नफा कमावत आहेत. हे तिघे मित्र मुंबईतील एका बँकेत काम करायचे; पण गावाकडेच शेती करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळेच 9 वर्षांपूर्वी, 2014 मध्ये नोकरी सोडून त्यांनी गावी येऊन शेती करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या शेतात रोज सुमारे 20 ते 25 मजूर काम करतात. या तीन मित्रांनी शेतीचे व्यवसायात रूपांतर केले आहे. त्यांनी नोकरी केली असती तर ते फक्त स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकले असते. आता शेती करून ते इतरांनाही रोजगार देत आहेत. शेतीतील सुरुवातीच्या काही प्रयोगानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी हिरव्या भाज्यांची लागवड सुरू केली. आधी 10 बिघा जमिनीत कोबी, काकडी आणि ब्रोकोलीची लागवड केली. यातून चांगली कमाई झाली. यानंतर त्यांनी हळूहळू क्षेत्र वाढवले. सध्या हे तिघे मित्र 50 बिघा भाड्याच्या जमिनीत हिरव्या भाज्यांची लागवड करत आहेत. हे तिन्ही मित्र वर्षभरात एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा भाजीपाला विकतात.
बिहार राज्यात कोल्ड स्टोअरेज, पॉली हाऊस, ग्रीन हाऊसचा तुटवडा आहे. तरीही आहे त्या परिस्थितीतून मार्ग शोधत या मित्रांनी मार्केटिंगचे भक्कम तंत्र उभे केले आहे. सरकारने अनुदान देऊन पॉली-ग्रीन हाऊस, कोल्ड स्टोअरेज यांची संख्या वाढवली तर शेतकर्यांचे उत्पन्न आणखी वाढेल. ही मंडळी वर्षभरात तीन पिके घेतात. ते 10 एकरात काकडी पिकवतात. याशिवाय, टरबूज-खरबूज यांचीही लागवड करतात. गेल्या वर्षी त्यांनी 25 लाख रुपयांची पपई विकली. याशिवाय कोबी, भोपळा, ब्रोकोली विकूनही लाखो रुपये ते मिळवतात. बिहारमधील स्थानिक बाजारात तसेच कोलकाता-दिल्लीतही ते माल विकतात. आता लवकरच ते परदेशात थेट निर्यात सुरू करणार आहे.
विनय कुमार सांगतो, की बिहार राज्यात अजूनही शेतीशी संबंधित अनेक प्रकारच्या सुविधा चांगल्या नाहीत. या सुविधा नसल्याने तिथे भाज्यांचे, कृषीमालाचे खूप नुकसान होते. त्यामुळे शेतकर्यांना पडेल किंमतीत माल विकण्यावाचून पर्याय राहत नाही. बिहारमध्ये पुरेसे कोल्ड स्टोअरेज नसल्यामुळे ते आज इंदूरहून गाजर विकत घेतात. तिथल्याच शीतगृहात ठेवतत. जर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोअरेज किंवा साठवणुकीची व्यवस्था असती तर राज्यातील शेतकर्यांनी गाजराची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असती. त्यांना माल शीतगृहात ठेवून चांगल्या दराने विक्री करता आला असता. अलीकडे राज्य सरकार शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे; पण त्याचा वेग खूपच कमी आहे. सर्वच सरकारांनी शेतीविषयक आधुनिक सुविधा पुरविण्यावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा या मित्रांनी व्यक्त केली.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- 65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई
- टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन