बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र; उत्तर कर्नाटकात चक्रीवादळाचा अनुकूल परिणाम
संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेशसाठीही चांगली बातमी आहे. गेले अनेक दिवस रुसलेला पाऊस आता आजपासून चांगला बरसण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदर या खासगी हवामान अंदाज एजन्सीसह सरकारी हवामान खात्याचेही (आयएमडी) तसा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, पाऊस उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून बरसण्याची शक्यता आहे. तर, कोकणासह मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कर्नाटकातील चक्रीवादळाचा हा अनुकूल परिणाम मानला जातो.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी ऑगस्ट महिना जवळजवळ कोरडा गेला होता. या महिन्यात गेल्या 120 वर्षांतील सर्वात कमी 40% तुटीचा पाऊस राहिला. आताही बहुतांश भागात हवामान जवळपास कोरडेच आहे. महाराष्ट्रात तर पावसाची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. यामुळे राज्यावर दुष्काळी परिस्थितीचे सावट होते. या दोन्ही राज्यांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. राज्याच्या बहुतेक भागात पिके माना टाकण्याच्या स्थितीत आहेत. पिकांना जीवदान मिळण्यासाठी पाऊस अत्यंत आवश्यक होता. या पावसामुळे मरगळलेल्या पिकांना नक्कीच नवसंजीवनी मिळेल. उशिरा का होईना काहीसा पाऊस आता बरसणार असल्याने बळीराजाची चिंता कमी होईल.
हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता : कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या काही भागात काल, रविवारपासून चांगला पाऊस होत आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आजपासून हळूहळू वाढेल. त्यानंतर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रालगतच्या भागांवरून पाऊस वर सरकेल. 5 सप्टेंबरपासून, मध्य प्रदेशच्या पूर्व भागात पाऊस सुरू होईल. 6 किंवा 7 सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल.
मान्सून पुन्हा कसा सक्रीय झाला?
वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र नव्याने निर्माण झाले आहे. याशिवाय, अंतर्गत उत्तर कर्नाटकात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. दोन्ही शाखांतील घडामोडींमुळे तीव्र पर्जन्यमानाची अनुकूल स्थिती आहे. त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला होणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू पश्चिमेकडे, दक्षिण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे सरकेल. या दोन हवामान प्रणालींमधील परस्परसंवादामुळे छत्तीसगड आणि तेलंगणासह अनेक राज्यांमध्येही पावसाच्या हालचाली तीव्र होतील. या राज्यांमध्ये पुढील सात ते आठ दिवस विखुरलेला पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
पुणे वेधशाळेने दिलेली माहिती
पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी “ॲग्रोवर्ल्ड“ला दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर उत्तरेकडे चक्राकार वारे तयार झाले आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण होत आहे. मंगळवारपर्यंत सक्रीय होणे अपेक्षित असलेला हा कमी दाबाचा नवा पट्टा विदर्भ ते थेट दक्षिण कर्नाटक अशा भूभागाला व्यापून जाणार आहे. या स्थितीमुळे रविवारी, 3 सप्टेंबर रोजी, गोव्यासह कोकण तसेच दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. आता आज, सोमवार,4 सप्टेंबरनंतर, कर्नाटकलगतच्या मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे परिसरातही पुढील आठवड्यात पाऊस बरसत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील घाट परिसरातही येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी केला गेला आहे.