मुंबई : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्याच्या काही भागातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. एकीकडे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात धुंवाधार पाऊस आहे. उत्तरेत अनेक ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यात आणखी काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अनुमानानुसार, राज्यात येत्या काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. “या” तारखेबाबत आपण जाणून घेऊ.
या महिन्यात, काही ठिकाणांचा अपवाद वगळता, आतापर्यंत मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत हलका आणि तुटपुंजा पाऊस झाला आहे. यापुढेही पुढील आठवडाभर मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसह राज्याच्या बहुतांश भागातही, हलक्या पावसाचीच शक्यता आहे. आयएमडी, मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले, की मान्सून सध्या हिमालयाच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात घाट भाग व काही अपवाद वगळता बहुतांश भागात मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, काही भागात मुसळधार पावसाच्या अत्यंत तुरळक सरींचा अपवाद वगळता येत्या आठवड्यात हलकाच पाऊस सुरू राहील. पुढील पाच दिवसांच्या, 16 ऑगस्टपर्यंतच्या, अंदाजात हवामान विभागाने मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा जारी केलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये फक्त हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. राज्यातही बहुतांश भागात हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी IMDचा यलो अलर्ट
या वर्षी, मान्सून 11 जूनऐवजी, दोन आठवड्यांच्या विलंबानंतर 22 जून रोजी राज्यात दाखल झाला. जूनचा उतरार्ध वगळता महिना कोरडा गेला. जुलैत चांगला पाऊस बरसला. जुलैच्या उत्तरार्धात पावसाने घेतलेली विश्रांती ऑगस्टमध्येही कायम आहे. आता पुढील आठवडाभरातही महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडे राहतील. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी मात्र यलो अलर्ट जारी केला आहे. या प्रदेशातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
मान्सूनचा वेग 18 ऑगस्टपासून वाढणार!
आयएमडी, मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या, “सध्या हवामानात कोणताही बदल नाही. मात्र, पुढील आठवड्याच्या शेवटी मान्सूनची अनुकूल परिस्थिती होऊ शकेल. त्यावेळी पश्चिमेकडील जोरदार वारे वाहण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत, ऑगस्ट महिन्यात फक्त हलका पाऊस पडला आहे. पुढील आठवड्यातही तसा पावसाचा जोर कमीच राहील. सध्या मान्सून हिमालयाच्या दिशेने सरकला आहे, त्यामुळे आपल्याकडे मान्सूनचा ‘ब्रेक’ आहे. मान्सूनचा पुढील सक्रीय टप्पा 18 ऑगस्टनंतर सुरू होण्याची अपेक्षा आहे. 18 ऑगस्टपासून राज्यात मान्सूनचा वेग वाढेल.
पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणतात, “IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकण विभागातील काही भागात शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता दिसते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण त्याबाबत अजून स्पष्टता दिसत नाही.
आज, 14 ऑगस्ट सकाळच्या उपग्रह नितिक्षणानुसार, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, राज्यातील घाट क्षेत्राचा काही भाग, कोकण, तेलंगणा आणि मध्य-पूर्व व ईशान्य भारताच्या काही भागात विखुरलेले ढगांचे अस्तित्त्व दिसतेय. या भागात काही ठिकाणी आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.