मुंबई : चालू हंगामात म्हणजे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत, भारतातील कापसाची निर्यात 19 वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. भारतातील शेतकऱ्यांचा तेलबिया, कडधान्याकडे वाढता कल दिसत आहे. याशिवाय, युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशातून मागणी कमकुवत राहिल्यामुळे, भारतातील उत्पादन आणि निर्यात या दोन्हीमध्ये विक्रमी घट नोंदविली जात आहे. यामुळे कापसाबाबत भारत निव्वळ आयातदार होण्याचा धोका आहे.
भारत, जगातील सर्वात मोठ्या कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. कापूस उत्पादन आणि निर्यात या दोन्हीमध्ये भारत आघाडीवर असतो. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या युक्रेन युद्धामुळे अमेरिका, युरोप व इतर देशात कापड उत्पादन प्रभावित झाले. कापड उत्पादकांकडून कमकुवत मागणीमुळे, उत्पादन कमी असूनही काही अपवाद वगळता भारतात कापसाच्या किमतीही नियंत्रित राहिल्या.
निर्मल रायझामिका 👇
अमेरिकी कृषी विभागाचा अहवाल
यंदाच्या पीक हंगामात म्हणजेच, ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत भारताची कापूस निर्यात 19 वर्षांतील नीचांकी पातळीवर जाण्याची भीती आहे. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरच्या (USDA) अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण शेतकरी तेलबिया आणि कडधान्ये यासारख्या इतर फायदेशीर पिकांकडे वळत आहेत.
USDA च्या आकडेवारीनुसार, भारतीय कापूस धाग्याची निर्यात आर्थिक वर्ष 2023 मध्ये 6 लाख 64 हजार टनांच्या दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचण्याची भीती आहे. त्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात भारतातून सर्वाधिक 10 लाख 38 हजार टन कापूस निर्यात झाली होती.
कापूस धाग्याच्या मूल्यात मोठी घट
मे 2023 मध्ये कापूस धाग्याचे मूल्य आणि हातमाग उत्पादनांच्या निर्यातीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% घसरण झाली. गेल्या आर्थिक वर्षातील 6.78 अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा भारतातून कापूस निर्यात जवळपास 75% घसरून 2.65 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कोविड-19 महामारीनंतरही मजबूत मागणीमुळे धागा उत्पादकांनी विक्रमी नफा कमावला होता. याशिवाय, जागतिक किमतीच्या तुलनेत देशांतर्गत कापसाच्या किमती कमी झाल्यामुळे, अमेरिकेने मानवी हक्कांच्या आधारावर चीनच्या शिनजियांग प्रदेशात उत्पादित कापसाच्या उत्पादनांवर बंदी घातल्याने भारतातील कापसाला मागणी वाढली होती.
चीनऐवजी आता बांगलादेश भारतीय कापसाचा आयातदार
आर्थिक वर्ष 23 मध्ये मागणी दबावाखाली आली आणि देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याने भारत निव्वळ आयातदार बनण्याची भीती निर्माण झाली. भारतातील कापड उत्पादनामुळे देशांतर्गत बाजारपेठेतूनच कपाशीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
कोविड-19 साथीनंतर चीनमधील मागणीत कमालीची घसरण झाली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, चीन हा भारतीय कापूस धाग्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. अमेरिकेने चीनमध्ये उत्पादित कापडांच्या आयातीस बंदी घातल्यानंतर मात्र भारतासाठी बांगलादेशने चीनची जागा घेतली. गेल्या दोन वर्षांत बांगला देश हा भारतीय कापूस धाग्याचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे.
ॲग्रोवर्ल्डच्या सल्ल्याने मर रोगावर नियंत्रण
पावसाचे असमान वितरण; कापूस लागवडीत घट
कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, काही प्रमुख वाणांच्या कापूस लागवडीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात कापसाची पेरणी 8.5% ने कमी होऊन 70 लाख हेक्टरवर मर्यादित राहिली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात कापसाची मोठी लागवड होते. यंदा दडी मारलेल्या मान्सूनने जुलैमध्ये बरीचशी कसर भरून काढली आहे. तरीही, मुख्य कापूस उत्पादक राज्यात मान्सूनच्या पावसाचे असमान वितरण हा कापूस लागवडीसाठी चिंतेचा विषय आहे. गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात पावसाची कमतरता 22% होती. तेलंगणात 27% आणि आंध्र प्रदेशात 14% तूट होती. तथापि, भारतातील सर्वात मोठ्या कापूस उत्पादक गुजरातमध्ये सरासरीपेक्षा 106% जास्त पावसामुळे कापूस पेरणीत 4.6% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात फक्त 17 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.4% कमी लागवड यंदा आहे.
CAI ने कापूस उत्पादनाचा अंदाज खालावला
सरकारच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2022-23 या वर्षात (जुलै-जून) कापूस उत्पादन 3 कोटी 43 लाख गाठींवर जाण्याची शक्यता आहे. (1 गाठ = 170 किलो) यापूर्वी ते 3 कोटी 11 लाख गाठी इतके होते. तथापि, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (CAI) यंदा कापूस उत्पादन खालावून 2 कोटी 98 लाख गाठ होण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या वर्षी (2021-22) कापूस उत्पादन 3 कोटी 7 लाख गाठी इतके झाले होते.
कापूस धाग्याच्या स्पिनर्स कंपन्यांच्या नफ्यालाही कात्री
केअर एज रेटिंग एजन्सीने, भारतीय कापूस धाग्याची निर्यात एका दशकात सर्वात कमी पातळीवर असल्याचे म्हटले आहे. विक्रीचे प्रमाणही कमी झाले असून कापूस धाग्याच्या स्पिनर्ससाठी आर्थिक वर्ष 2023 मध्ये ऑपरेटिंग नफा मार्जिनमध्येही घट झाली आहे. ऐतिहासिक सरासरीपेक्षाही नफा पातळी कमी राहिली. गेल्या काही वर्षांपासून भारत हा कापसाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. मात्र, आता भारत निव्वळ आयातदार बनून राहण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कापूस उत्पादन आणि उत्पादकता वाढलेली नसली तरी कापसाची मागणी मात्र वाढत आहे. माजी वस्त्रोद्योग सचिव यूपी सिंग यांनी गेल्या वर्षीच याबाबत सावध केले होते. गेल्या तीन वर्षांत कापडाच्या किमती सातत्याने वाढत असताना खालावणारे कापूस उत्पादनही चिंताजनक आहे. कपडे आणि पादत्राणे यामुळेच महागाईमध्ये मोठी वाढ होत असल्याचे सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे.