गौरव हरताळे
जळगाव : दैनंदिन जीवन जगत असतांना मानवाला ऋतुमानानुसार ऊन, पाऊस, वारा, थंडी याचा सामना करावा लागतो. आजचे तापमान इतके, आज इतक्या मी.मी. पावसाची नोंद हे आपण नेहमी वाचत किंवा ऐकत असतो. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का? की, कशी काढली जाते ही आकडेवारी. त्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेवू या त्यासंदर्भात…
निर्मल रायझामिका 👇
तापमान
सर्वात आधी आपण तापमानाची कशी नोंद केली जाते, यासंदर्भात जाणून घेवू. सूर्याच्या उष्णतेची तिव्रता अर्थात पृथ्वीवर पडणार्या किरणांची तिव्रता नोंद करण्यासाठी सनशाईन रेकॉर्डरचा उपयोग केला जातो. त्याला आपण तापमान असे म्हणतो. सनशाईन रेकॉर्डर हा एक काचेचा गोळा असतो, त्याचा व्यास जवळपास 10 से.मी. पर्यंतचा असतो. हा काचेचा गोळा एका अर्धगोलाकार धातूच्या सहाय्याने समकेंद्रितरित्या ठेवलेला असतो. यात अर्धगोलाकार धातूवर एक पट्टी लावली जाते. काचेच्या गोळ्याच्या सहाय्याने पट्टीवर सूर्याची किरणे एकवटली जाऊन त्या पट्टीवर जळाल्याचे निशाण पडते. यावरून किमान आणि कमाल म्हणजेच जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानाची नोंद केली जाते.
पावसाचे पर्जन्यमान
पावसाचे पर्जन्यमान हे मिलीलिटरमध्ये मोजले जाते. पर्जन्यमान मोजण्यासाठी अनेक प्रकारचे यंत्र आहेत. त्यातील रेनमीटर हे हाताळण्यास सर्वात सोपे यंत्र आहे. रेनमीटर हे धातूचे असून ते सिमेंटच्या साहाय्याने एका मोकळ्या जागेत जमिनीवर स्थापित केले जाते. त्याचा वरील भाग गोल तर खालील भाग शंखाकृती असून असतो. यात पावसाचे पाणी साठवले जाते. या साठलेल्या पाण्याला एका काचेच्या नळीच्या साहाय्याने मोजले जाते. यावरून किती पाऊस झाला याची नोंद केली जाते. तासी 2.5 मि.लि. व त्यापेक्षा जास्त नोंद झाल्यास त्याला साधारण पाऊस तर 60 मि.लि. व त्यापेक्षा अधिक नोंद झाल्यास त्याला जोरदार पाऊस म्हणून नोंद केली जाते.
हवेचा दाब
बैरोमीटर हे एक असे उपकरण आहे, ज्यात हवेचा दाब मोजला जातो. बैरोमीटरमध्ये पारा असतो. तो पारा स्वयंचलित पद्धतीने काम करीत असतो. हा पारा जस-जसा खाली खाली येतो, त्यावरुन हवेचा दाब किती? याची नोंद केली जाते. हा पारा अगदी खाली आल्यास वादळ-वारा येण्याची शक्यता वर्तविली जाते.
वार्याचा वेग
तापमान, पावसाची सरासरी जसी मोजली जाते, तसा वार्याचा वेगही मोजला जातो. अनिमोमीटर या यंत्राच्या सहाय्याने त्याचा वेग मोजला जातो. वार्याचा वेग हा किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या प्रमाणात मोजला जातो. (1 नॉट = ताशी 1.852 किमी.) अनिमोमीटर हे यंत्र उंच ठिकाणावर बसवले जाते.
वार्याची दिशा
दिशादर्शक हे हवेच्या स्तिथी दर्शविण्यासाठी उपयोगी ठरते. या यंत्राच्या सहाय्याने हवेची दिशा समजण्यास मदत होते. दिशादर्शक हे यंत्र सुद्धा उंचीवरच्या ठिकाणी स्थापित केले जाते. यात आठ आरे असतात यात सर्व दिशा असतात तर एक फिरता भाग असतो ज्याच्या सहाय्याने दिशा ठरवली जात असते.
जमिनीची उष्णता
ज्याप्रमाणे काही अंतरावर भाषा बदलते, त्याचप्रमाणे जमिनीची प्रतही बदलते. त्यासाठी जमिनीची उष्णता मोजण्यासाठी (Soil Thermometers) उष्णता मापीचा उपयोग केला जातो. या उपकरणाच्या सहाय्याने जमिनीतील 30 से.मी. पर्यंतचे तापमान मोजले जातो. हे यंत्र शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून या यंत्राच्या माध्यमातून जमिनीची प्रतपाहून त्याप्रमाणे पोषक वातावरण तयार केले जाऊ शकते.
हवेतील आद्रता
हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आद्रता म्हणतात. हवेतील आद्रता ही पाऊस निर्मितीसाठी महत्वाचा घटक आहे. हवेतील आद्रता (Hygrometers) हायग्रोमीटर किंवा (Psychrometer) सायक्रोमीटर यंत्राच्या सहाय्याने मोजली जाते. या आद्रतेवरच पावसाची स्थिती अवलंबून असते. आद्रता नसलेली हवा कोरडी असते. यासाठीची एक सोपी पद्धतही आहे. ज्यात तांब्याच्या भांड्याचा उपयोग करून पाणी साठवण केली जाते. हवेचं तापमान कमी होत असतांना ज्या बिंदुवर दवं हवेपासून विलग होतात, तो बिंदु ड्यु पॉइंट म्हणून ओळखला जातो. ह्या बिंदुचे तपमान मोजूनही सापेक्ष आणि निरपेक्ष आद्रता शोधता येते.