मुंबई : पावसाचे देशभरात असमान चित्र असताना जगभरात “ग्लोबल वॉर्मिग”ची (Global Warming) भीतीही गडद होत आहे. तीन दिवसांपूर्वीच जगातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुजरात-महाराष्ट्रपासून थेट केरळपर्यंत किनारी क्षेत्रात पावासाच्या ढगांची मुबलक उपस्थिती दिसत आहे. कोकणात तर येत्या तीन दिवस मुसळधार पावसाचे धुमशान सुरू राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीची भीती आहे. या काळात उत्तर-मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.
यंदा राज्यात मान्सून बऱ्याच उशिराने 22 जून रोजी दाखल झाला. त्यातच कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर वगळता इतरत्र पावसाची स्थिती म्हणावी तितकी समाधानकारक नाही. त्यामुळे बहुतांश भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत, तर काही भागात शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आवाहन दुर्लक्षून घायकुतीला येऊन पुरेसा पाऊस नसताना पेरण्या केल्या आहेत. तिथे आता दुबार पेरणीचे संकट आहे.
उत्तर-मध्य भारतात पावसाला अनुकूल क्षेत्र
केंद्र सरकारच्या अर्थ सायन्स मंत्रालयातील उपग्रह निरीक्षण वैज्ञानिक आणि जियोसॅप्टिअल ॲप्लिकेशन्सचे प्रमुख अशिम मित्रा यांनी INSAT3DR उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्र, डेटाचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, आता उत्तर-मध्य भारतात SHET म्हणजे पावसाला अनुकूल क्षेत्र विकसित झाले आहे. परिणामी, पूर्वोत्तर भारतील क्षेत्र वगळता भारताच्या मुख्य भूभागावर म्हणजे उत्तर व मध्य भारतात आता चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयुष्यात काही करायचे असेल तर स्वप्न पहा
सनशाईन अॅग्रो प्रा. लि. चे संचालक राजेश चौधरी यांचा सल्ला
https://eagroworld.in/if-you-want-to-do-something-in-life-dream/
जगातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद
जगातील तापमान वाढीची (ग्लोबल वॉर्मिग) चिंता असताना सोमवार, 3 जुलै रोजी जगातील, या दशकातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. सर्वात उष्ण दिवस म्हणून 3 आणि 4 जुलै या दोन दिवसाची नोंद झाली आहे. 3 जुलै रोजी 17.01 अंश सेल्सिअस इतक्या जागतिक सरासरी तापमानाची नोंद झाली. मंगळवार, 4 जुलै रोजी जागतिक तापमान 17.18 अंश सेल्सिअस इतके राहिले. या काळात अमेरिकेत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. पॅसिफिक महासागरातील एल-निनो प्रभावातून जगाच्या तापमानात वाढ होत आहे. याशिवाय, पेट्रोल-डिझेल वैगेरे मानवनिर्मित इंधनामुळे जगाचे तापमान वाढत असल्याचे स्टँडफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ क्रिस फिल्ड यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिगमुळे जगाचे भवितव्य अतिशय भयावह उष्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचे दूरगामी परिणाम निसर्ग चक्रातील बदल, बदलेला मान्सून अन् हवामान तसेच जीवनमानावर होताना दिसत आहे.
दक्षिणेकडील पाऊस मध्य, उत्तर भारताकडे सरकणार
पावसाला अनुकूल पट्टा (CC) सध्या अंतर्गत ओडिसा, मध्य प्रदेशकडे हलविले गेला आहे. तर, मान्सून ट्रफ लाइन (मान्सून पावसाला चालना देणारे क्षेत्र) गुजरात ते उत्तर केरळपर्यंत कायम आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्रात, कोकणात; तसेच कर्नाटकचे उत्तर किनारपट्टी क्षेत्र, कारवार, मध्य प्रदेश आणि दिल्ली व लगतच्या भागात मुसळधार पाऊस पडेल. उत्तर आणि मध्य भारतात अधूनमधून विश्रांतीसह मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. मध्य केरळ, दक्षिण केरळ व लगतच्या तामिळनाडू घाटांवर मध्यम पाऊस सुरू राहील. कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होत असल्यामुळे आजपासून दक्षिण द्वीपकल्प भागात पाऊस कमी होईल.
राज्यातील आजचे पावसाचे अलर्ट
ऑरेंज अलर्ट : गोंदिया, नागपूर, वर्धा, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पालघर
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे आणि कोल्हापूर
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज चांगल्या पावसाची शक्यता आहे. जळगावसह पुण्यात मात्र पावसाचा कोणताही इशारा नाही. या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते हलका-मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.