मुंबई : गेले अनेक दिवस मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकरी, सर्वसामान्यांसाठी भारतीय हवामान खात्याने (IMD) एक आनंदवार्ता (Good News) दिली आहे. मान्सून 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून वर सरकला आहे, असे पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.
होसाळीकर यांनी केलेले ट्विट असे –
आनंद वार्ता : आज 25 जून रोजी मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल झाला. मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापण्याची सरासरी तारीख 15 जून आहे. आज मान्सून राज्याची सीमा ओलांडून अजून वर सरकला आहे.
मध्य, उत्तर महाराष्ट्रावर तुरळक ढग
आज, रविवार, 25 जून रोजी, दुपारी 3.15 वाजता घेतलेले हे नवीनतम उपग्रह छायाचित्र पाहा. त्यानुसार, मान्सून अगदी शाश्वतरित्या सक्रिय होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मान्सून वेगाने वाटचाल करण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती हे उपग्रह छायाचित्र दर्शवित आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि तो ओडिशा आणि लगतच्या भागांवर उत्तर-वायव्येकडे सरकण्याची शक्यता असल्याचे “आयएमडी”ने म्हटले आहे. या नव्या स्थितीमुळे विदर्भात ढगांची गर्दी दिसत असली तरी मध्य व उत्तर महाराष्ट्रात तुरळक ढग दिसत आहेत. त्यामुळे या भागाला समाधानकारक पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
मान्सूनने बहुतांश देश व्यापला
मान्सूनने रविवारी, 25 जून रोजी वेगवान प्रगती केली. मध्य अरबी समुद्र, लगतच्या उर्वरित भागात, उत्तर अरबी समुद्र, मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि हरियाणात आज मान्सून पोहोचला. याशिवाय, उत्तराखंडच्या उर्वरित भागांसह महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्येही आज नैऋत्य मान्सूनची सुपरफास्ट प्रगती झाली. हिमाचल प्रदेशचा बहुतेक भाग, जम्मू-काश्मीरच्या बहुतांश भागात आणि लडाखमध्येही मान्सून दाखल झाला आहे. आता देशात फक्त पंजाबमध्ये मान्सून दाखल व्हायचा राहिला आहे. याशिवाय, उत्तर गुजरातचा काही किनारपट्टीलगतचा प्रदेश, निम्मा राजस्थान, हरियाणातील काही भाग आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात मान्सूनचे आगमन राहिले आहे. सोबतच्या छायाचित्रातील मान्सूनची आगेकूच पाहिली, तर संपूर्ण देश मान्सूनने कवेत घेतल्याचे दिसून येते.