मुंबई : Monsoon 2023 संदर्भात “आयएमडी”च्या नव्या अपडेटनुसार, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. बिपोरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानात जाऊन धडकणार असल्याची सध्या चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, रखडलेल्या मान्सूनला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मान्सूनचा उद्या केरळात दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस येत्या 4-5 दिवसात मुंबई-कोकणात आणि पुढच्या आठवड्यात राज्यभरात येण्याची शक्यता आहे. “स्कायमेट” अंदाज मात्र वेगळाच आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा ऱ्हास होईपर्यंत मान्सून “कमजोर” राहील, असे त्यांचे अनुमान आहे.
चक्रीवादळ तीव्र झाल्याने देशात काही ठिकाणी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दिल्ली, उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसात कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागू शकेल. दुसरीकडे, मान्सून लांबल्याने देशातील काही भागात खरीप पिकांच्या, विशेषतः धानाच्या पेरणीला विलंब होऊ शकतो.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वारे चक्रीवादळ सुरू असतानाही कायम राहिले आहेत. पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्येही वाढ झाली आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात कालपासून मोठी वाढ होत आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. शुक्रवारपासून केरळातील मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळही अतिशय तीव्र वादळात रूपांतरित झाले आहे. ते पाकिस्तानी किनारपट्टीवर जाऊन धडकू शकेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
“स्कायमेट”चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी मात्र केरळातील मान्सून काहीसा लांबू शकतो, असे म्हटले आहे. सध्याच्या मान्सून प्रणालीभोवती ढगांचे वस्तुमान केंद्रित झाले असले तरी केरळच्या किनारपट्टीवर पुरेसा ओलावा पोहोचत नाही. त्यामुळे मान्सून सुरू होण्याचे निकष येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाऊ शकतील, असे दिसत नसल्याचे “स्कायमेट”ने सांगितले आहे. केरळमध्ये मान्सून सुरू झाला तरी बिपरजॉय चक्रीवादळ संपेपर्यंत त्याला जोर येणार नाही. 12 जूनच्या सुमारास वादळाचा ऱ्हास होईपर्यंत मान्सून “कमजोर” राहील, असा “स्कायमेट”चा अंदाज आहे.
दिल्ली-उत्तर प्रदेशात तापमान वाढणार
दिल्लीसह उत्तर प्रदेशात पुढील 2-3 दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. 8 ते 11 जूनपर्यंत उत्तर प्रदेशात काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. दिल्लीत आकाश निरभ्र राहील आणि पुढील 2-3 दिवसांत तापमान 2- 3 अंश सेल्सिअस वाढेल. 10 किंवा 11 जूनपर्यंत दिल्लीतील तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, असे IMD चे प्रादेशिक प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.