मुंबई : Monsoon Update… अरबी समुद्रात अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळाने लांबलेला मान्सून आता नेमका येणार तरी किती दिवसांनी, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे, येत्या 3 दिवसात बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय, समुद्रही खवळणार आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडला तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी पहाटेपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉय अजून तीव्र झाले आहे. सध्या ते गोव्यापासून 890 तर मुंबईपासून 1,000 किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ पुढील 24 तासात अत्यंत तीव्र होण्याची व उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 दिवसात वादळ पाकिस्तानकडे सरकत कमजोर होत जाईल.
160 किलोमीटर वेगाचे विध्वंसक तुफान
बिपरजॉय हे अतिशय विध्वंसक चक्रीवादळ असणार आहे. समुद्रात त्याचा वेग 135-145 किमी ताशी असेल. कदाचित 160 किमी प्रतितास वेगानेही ते जोर धरेल. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ केंद्रापासून लगतचा किनारा व किनारपट्टी क्षेत्रात अतिशय तीव्र कठोर हवामान दिसून येण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, 8, 9 व 10 जून रोजी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्याचा वेग 40 ते 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार वादळी वारे वाहतील. नैऋत्य अरबी समुद्रात कर्नाटक, गोवा व महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ कमजोर होईस्तोवर मच्छिमारांनी समुद्र क्षेत्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/
महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
बिपरजॉय वादळाचा तूर्तास तरी देशाच्या पश्चिम किनारपट्टीला धोका नाही. उत्तरेकडे सरकत हे वादळ ओमानच्या किनारपट्टीकडे जाईल, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. मात्र, गोवा, महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर ‘आयएमडी’ने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी चार दिवसात कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनचा पाऊस आठवडाभर लांबला
चक्रीवादळामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. आता मान्सूनचा पाऊस किमान आठवडाभर तरी लांबला आहे. एरवी, एक जून रोजी मान्सून केरळात दाखल होतो. यंदा मात्र जूनचा पहिला आठवडा संपला तरी केरळमध्ये मान्सूनच्या पावसाला सुरवात झाली नाही. यापूर्वी हवामान खात्याने केरळात 4 जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता. अरबी समुद्रात अचानक आलेल्या चक्रीवादळाने तो अंदाज चुकला आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ थंडावायला किमान 3-4 दिवस लागतील त्यानंतर पुन्हा मान्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकेल. म्हणजे केरळात 10 जूननंतरच मान्सून सक्रीय होऊ शकेल. मुंबई व कोकणात मान्सून पोहोचायला जूनचा तिसरा आठवडा उजाडेल. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जुलै सुरू होण्याची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. समुद्रात कोणतीही नवी स्थिती न उद्भवल्यास किंवा मान्सूनच्या प्रगतीत कोणताही अडथळा आला नाही तरी त्याचे वेळापत्रक 8-10 दिवसांनी पुढे सरकलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई आजिबात करू नये. मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होईपर्यंत प्रतीक्षा करावी. येत्या 2-4 दिवसात राज्यात पाऊस झाला तरी हा मान्सूनपूर्व पाऊस असेल. मान्सूनपूर्व पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.
“ॲग्रोवर्ल्ड”तर्फेही तमाम शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे, की भारतीय हवामान खाते, राज्याचा कृषी विभाग यांच्या अंदाज, सूचना व मार्गदर्शनानुसारच शेतीविषयक पेरणीची कामे हाती घ्यावीत. उचित हवामान शिक्षण, पदवी आणि योग्य तांत्रिक ज्ञान नसलेल्या कोणत्याही स्वयंघोषित हवामान तज्ञांच्या अशास्त्रीय अंदाजांना बळी पडू नये – संपादक
दिल्लीत 36 वर्षांतील सर्वात कूल मे महिना
यंदाचा मे महिना हा दिल्लीत 36 वर्षांतील सर्वात कूल मे महिना ठरला आहे. ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दिल्लीत 36 वर्षांतील सर्वात थंड मे महिना नोंदवला गेला. सतत पडणाऱ्या पावसाने यावर्षी सरासरी कमाल तापमान 36.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले. हवामानातील बदलामुळे हे घडले आहे. याआधी उन्हाळ्यात असे हवामान कधीही पाहिले नव्हते, असे बुजुर्ग मंडळी सांगत आहेत. मात्र, आता मान्सूनचा पाऊस कदाचित जुलै आणि ऑगस्टमध्ये पडेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कदाचित हे सारे ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत असावे. लोकं झाडे तोडत आहेत, पर्यावरण समतोल आपण बिघडवून ठेवलाय. निसर्ग काय करेल सांगता येत नाही. पुढच्या पिढ्यांचे भविष्य चिंताजनक असेल, अशी भीती बुजुर्ग व्यक्त करीत आहेत.