विष्णू मोरे, जळगाव
चांगले शिक्षण घेवून सरकारी नोकरी करावी. सरकारी नोकरी नाही मिळाली तर कॉर्पोरेट कंपनीत तरी काम करावे, अशी आजच्या प्रत्येक तरण-तरुणीची इच्छा असते. त्यामुळे त्यांना गायी, म्हशींचा सांभाळ करावा, त्यांचे दुध काढणे, शेण-पाणी करणे असे काम सांगितले तर नकार मिळाल्या शिवाय राहणार नाही. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील एक उच्चशिक्षित तरुणी याला अपवाद ठरत आहे. या तरुणीने स्वत:ला या व्यवसायात झोकून देत यशाचे शिखर गाठले आहे. कुटुंबियांच्या मदतीने या तरुणीने दोन म्हशींपासून 130 म्हशी करण्यापर्यंत तिने मजल मारली आहे. गोठ्यातील दैनंदिन कामे, दूध संकलन, डेअरीला दूध घालणे, बायोगॅस प्रकल्प, मुरघास आदी सर्व कामे ही तरुणी करत आहे. आज ही तरुणी दुग्ध व्यवसायातून महिन्याकाठी 6 ते 8 लाख रुपये कमवित असून ही तरुणी अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
श्रध्दा सत्यवान ढवण (वय-23), असे या यशस्वी दुग्ध व्यवसायीक तरुणीचे नाव असून महाविद्यालयीन दशेपासूनच त्यांनी दुग्ध व्यवसायाची जबाबदारी स्विकारली आहे. श्रध्दा यांचे वडील सत्यवान ढवण हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे वडिलोपार्जीत साडे तीन एकर शेती आहे. त्यातच ते दिव्यांग असल्याने त्यांनी म्हशीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. हे करीत असतांना उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत म्हणून त्यांनी घरी एक-दोन म्हशी देखील ठेवल्या होत्या. या म्हशींचे दूध काढणे ते डेअरीला घालणे आदी कामांमध्ये श्रध्दा या वडीलांना मदत करत होत्या.
अन् सर्व गोष्टी शिकून घेतल्या
श्रद्धा वडीलांसोबत म्हशीच्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने इतर गावी जात होत्या. यातूनच त्यांनी दुध व्यवसायाची माहिती मिळवली. तसेच म्हशीची खरेदी करतांना काय काळजी घ्यावी यासारख्या बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या. 2009 साली त्यांच्याकडे एक दुभती म्हैस होती, तेव्हापासून त्यांनी म्हशीच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करत दुध व्यवसायात वाढ केली. श्रद्धा या वयाच्या 10 व्या वर्षापासून आई-वडीलांना दुध व्यवसायात मदत करत होत्या. त्यातूनच त्यांना दुध व्यवसायाची आवड निर्माण झाली. वडील दिव्यांग असल्याने वयाच्या 16 व्या वर्षीच श्रद्धांनी संपुर्ण दुध व्यवसायाची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे सहा म्हशी होत्या. सुरुवातीला त्या सायकलीवरून दूध घालायच्या. आता स्वत: चारचाकी चालवून डेअरीला दूध घालत आहेत.
दुहेरी कसरत
श्रद्धा या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची दुहेरी कसरत सुरु होती. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे त्यांनी एम.एस्सीचे शिक्षण घेत असतांना निघोज ते आळेफाटा असा 60 किलोमीटरचा प्रवास त्या दररोज दुचाकीने करुन दुध व्यवसायाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत होत्या. पहाटे चार वाजताच श्रध्दा यांच्या दिवसाची सुरवात व्हायची. सकाळी सात वाजेपर्यत दुध घालून कॉलेज करायचे आणि कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा पशुपालनाची सायंकाळची कामे करणे, स्वतः वाहन चालवत दोनशे ते तीनशे लिटर दूध डेअरीवर पोच करणे, असा दिनक्रम श्रध्दा यांचा होता.
2 म्हशींपासून केल्या 130 म्हशी
ढवण कुटूंबियांकडे सुरूवातीला 6 म्हशी असतांना एका झाडाखाली त्यांना बांधून त्याच ठिकाणी त्यांची निगा राखली जात होती. 2014 साली म्हशींमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर आणखी एक गोठा बांधण्यात आला. त्या ठिकाणी 15 ते 16 म्हशीच बांधता येत होत्या. जागा अपूर्ण पडू लागल्याने 2015 साली ढवण कुटूंबियांनी दुमजली गोठा बांधण्याचा निर्णय घेतला. पैशांची जस-जसी उपलब्धता होत गेली, तस-तसे गोठ्याचे बांधकाम होत गेले. 2017 साली या गोठ्याचे पूर्ण झाले. त्यासाठी त्यांना 30 लाख रुपये खर्च आला. दुमजली गोठ्यात 80 व पहिल्या दोन गोठ्यात दोन म्हशीपासून सुरु केलेला हा व्यवसाय आता 130 म्हशीपर्यत पोचला आहे.
झिरो वेस्ट मॅनेजमेंट
दुध व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर श्रध्दा यांनी म्हशीचा गोठा व्यवस्थापनातील खर्च करत इकोफ्रेडली करण्यावर भर दिला आहे. त्यांनी झिरो वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत त्या बायोगॅस, मुरघास, बायोगॅसपासून विज निर्मिती, जैविक खते निर्माण केली जात आहेत. शेण, गोमुत्र आणि गोठा धुतांना किंवा इतर कारणांनी वाया जाणार्यापासून ते बायोगॅस तयार करीत आहेत. अकरा लाख रुपये खर्च करुन त्यांनी बायोगॅस युनिट उभारले आहे. गॅस साठवण्यासाठी 60 हजार किलो साठवण क्षमतेचा बलुन बसविण्यात आला आहे.
बायोगॅसपासून वीज निर्मिती
या ठिकाणी तयार होणार्या बायोगॅसच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करणारे इंजीन चालविले जात आहे. त्यातून विद्युतपंप, कडबाकुट्टी मशिन, घर, गोठ्याला लागणारी वीज व इंधनासाठी लागणारा गॅसची गरज भागविली जात आहे. यातून महिन्याला लागणारा 10 ते 12 हजारांचा खर्च वाचत आहे.
गांडुळ, सेंद्रिय खत निर्मिती
म्हशीचे शेण, पाला पाचोळा आणि बायोगॅसच्या टँकमधून निघणार्या मिश्रणातून श्रद्धा यांनी गांडुळ व सेंद्रिय खत तयार करण्याला सुरूवात केली आहे. महिन्याला साधारण 60 टन गांडुळ खत तर 20 टन जिवाणू खत तयार करतात. महिन्याला म्हशीपासून टन खत मिळते. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी, फळबागा, टेरेस गार्डन, रोपवाटिकांसाठी या सेंद्रिय व गांडुळ खताची शेतकरी खरेदी करण्यासाठी येत असतात.
मुरघासातून चारा उपलब्धता
ढवण कुटूंबियांकडे साडेतीन एकर शेती असून त्यातून 130 म्हशीचा विस्तार संभाळताना एवढ्या पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे श्रध्दा यांनी मुरघासाला प्राधान्य देत आहेत. दर वर्षाला साधारण 100 टन मुरघास तयार करतात. निघोज परिसर तसा पाणीदार भाग आहे. त्यामुळे पावसाळा व हिवाळ्यात चारा उपलब्ध होतो. मात्र उन्हाळ्यात महागडा चारा खरेदी करावा लागत असल्याने अशा वेळी मुरघास कामी येतो. शिवाय चारा टंचाईचीही चिंता नसते.
शेतकर्यांना निवासी प्रशिक्षण
तरुण व शेतकर्यांनी दुध व्यवसायात यावे, यासाठी श्रध्दा यांनी शेती, दुध व्यवसायाबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण सुरु केले आहे. महिन्यातून तीन दिवस हे निवासी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी त्या नाममात्र शुल्क आकारत असले तरी यात प्रशिक्षणासाठी आलेल्या शेतकर्यांना राहणे, जेवण, प्रकल्प व्हिजीट यांसारख्या सुविधा दिल्या जातात. स्वतःचा अनुभव सांगतानाच अन्य बाबीची माहिती देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रीत केले जाते. देशभरातून शेतीकरी या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येत असतात. तसेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळावा यासाठी विनामुल्य कार्यशाळेचे आयोजन केले जाते. महिला दिनानिमित्त महिला शेतकर्यांसाठी देखील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महिन्याला 6 लाखांचे उत्पन्न
श्रध्दा ढवण यांनी 2 म्हशींपासून सुरु केलेला दुग्ध व्यवसाय आज 130 म्हशींवर पोहोचला आहे. त्यातून त्यांना महिन्याकाठी 6 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तसेच 6 लोकांना देखील त्या रोजगार देत आहेत. अत्यंत कमी वयात दुध व्यवसायाची जबाबदारी पेलवत म्हशीचा संभाळ करुन यशस्वी वाटचाल केलेल्या श्रद्धा ढवण यांचे राज्यभरात कौतुक होत आहे. माजी दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी गोठ्याला भेट दिली आहे तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी मंत्री जयंत पाटील, उद्योगपती आनंद महिंद्रा, आमदार निलेश लंके यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे. चला माती वाचवु या उपक्रमातूनही श्रद्धा ढवण काम करत आहेत.
नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे
सायकलीवरून दूध घेवून जातांना गावातील चौकांतून जावे लागे. परंतु, मी कोणतेही काम करतांना घाबरले नाही. तुम्ही जर का एखादे चांगले काम करीत असाल तर समाजही आपल्या मागे उभा राहतो. त्यामुळे तरुणींनी देखील न घाबरता काम केले पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात पुढे गेले पाहिजे. नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे.
– श्रध्दा ढवण,
रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर