जैन हिल्स कृषी महोत्सवात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इथे कापसाच्या प्लॉटमध्ये कापूस पिकाची नवीन प्रगत तंत्रज्ञानाचे लागवड केली गेली आहे. तसे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये कापूस हे अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात जवळपास 45 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची शेती होते. परंतु, कापसाचे सरासरी उत्पादकता ही फक्त तीन ते चार क्विंटलचीच आहे. आपले उत्पादन कमी असल्याने आर्थिक नफाही समाधानकारक हाती येत नाही.
ठिबक सिंचन लागवडीने मिळते अधिक उत्पादन
जे शेतकरी पावसाच्या भरवश्यावर कपाशी शेती करतात, त्यांचे उत्पादन तीन ते चार क्विंटल आहे. काही शेतकरी पोटा-पाण्यासाठी शेती करतात, त्यांचे उत्पादन 6 ते 8 क्विंटल आहे. जे शेतकरी पाट-पाण्यावर कापसाची लागवड करतात, त्यांचे एकरी 8 क्विंटल उत्पादन आहे. जे शेतकरी ठिबक सिंचनवर कपाशी लागवड करतात, त्यांचे 15 ते 20 क्विंटल कापसाचे उत्पादन असते. अधिक उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. कापसाचे उत्पादन वाढण्यासाठी ठिबक सिंचनवर लागवड करणे गरजेचे आहे आणि ठिबकद्वारेच खते देणेदेखील गरजेचे आहे.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024 |
गादी वाफ्यावर कपाशी लागवडीचा प्रयोग
जैन हिल्स या ठिकाणी आपण नवीन प्रयोग केला आहे. कापसाची लागवड साधारणपणे सपाट जमिनीवर शेतकरी करतात. मात्र, कापसाची लागवड सपाट जमिनीवर न करता आपण गादी वाफ्यावर करू शकलो तर त्याचा जास्त फायदा होणार आहे. गादीवाफा केल्याने काय होणार की, त्या ठिकाणी जास्त पाऊस झाला तरी नुकसान होणार नाही आणि जमिनीमधील पिकांच्या मुळांजवळ हवा खेळती राहील. त्यामुळे पिकाची वाढ होते.
गादी वाफ्यावर मल्चिंग फिल्मचा वापर
दुसरे म्हणजे आपण गादी वाफ्यावर मल्चिंग फिल्मचा वापर केला आहे. पंधरा ते वीस मायक्रोनच्या फिल्मचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण भर पावसात खत देऊ शकतो. यामुळे खतांचा निचरा होत नाही आणि हवा खेळती राहते. पिकाची वाढ जोमदार होते. मल्चिंग फिल्ममध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तण काढण्याचा खर्च कमी होतो. अशा पद्धतीने गादी वाफा, मल्चिंग ठिबक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञान हे कापूस शेतीमध्ये खूप मोठे वरदान आहे.
जैन टर्बो एक्सएल व्हरायटी, लागवड पद्धतीत बदल
या ठिकाणी आपण जैन ठिबक कापूस लागवड केली आहे. त्यासाठी आपण जैन टर्बो एक्सएल नावाची व्हरायटी वापरली आहे. येथे आपण लागवडीच्या पद्धती बदललेल्या आहे. त्याच बरोबर आपण दोन इतर जातीपण लावलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना सहज वाढणारे वाण लावायचे आहे, त्यासाठी “अजित 5”चा वापर केलेला असून झाडांची संख्या वाढविलेली आहे. ‘अजित 5’साठी झाडांची संख्या एकरी साडेआठ हजारांच्या वर असणारे अंतर ठेवले आहे. याचे अंतर हे चार बाय सव्वा फूट असून दोन झाडांतील अंतर हे चार फूट आहे आणि दोन झाडातील अंतर सव्वा फूट आहे. म्हणून इनलाईन सुध्दा आपण जैन टर्बो एक्सएल चार फुटांपर्यंत वापरलेला आहे. यात ड्रीपरचे अंतर सुद्धा सव्वा फूट आहे. सरळ वाढणाऱ्या झाडाचे अंतर आपण कमी ठेवलेले आहे.
अजित 5, सुपर कॉट व्हरायटी वापरून प्रयोग
दुसरे वाण आपण सुपर कॉट वापरलेले आहे. सुपर कॉट ही पसरणारी व्हरायटी आहे. त्यासाठी अंतर जास्त दिले जाते. दोन ओळीतील अंतर पाच फूट ठेवले आहे आणि दोन झाडांचे अंतर हे दीड फूट ठेवले आहे. अशामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचे लागवडीचे अंतर आपण ठेवलेले आहे. या व्हरायटीमध्ये ‘अजित 5’ ही अर्ली 140 दिवसाची व्हरायटी आहे आणि सुपर कॉट ही 160 दिवसाची व्हरायटी आहे. त्यामुळे व्हरायटीचा कालावधी पण बदलला आहे.
आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या शेतीसाठी कॉटन मिशन 2.0
या सर्व व्हरायटींचे एकत्रितपणे प्रात्यक्षिक आपण शेतकऱ्यांना दाखवले आहे. “कॉटन मिशन 2.0”मध्ये आपण कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळाले पाहिजे, यासाठी मार्गदर्शन करत आहोत. एकरी दहा क्विंटल उत्पादन कसे येईल, कारण कोरडवाहू शेतकऱ्यांना फक्त 3 ते 4 क्विंटल उत्पादन मिळत आहे. त्यामुळे त्यांना कापसाची शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची होत नाही, म्हणून ‘कॉटन मिशन 2.0’मध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी मदत करत आहोत. दुसरे ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांना एकरी 20 क्विंटल उत्पादन कसे मिळेल, यासाठी मार्गदर्शन करत आहोत. मल्चिंग फिल्मचा वापर आणि फर्टिगेशन करून एकरी 25 क्विंटल उत्पादन मिळवता येते, हेही इथल्या प्रयोगातून दिसून आले आहे.
बी. डी. जडे
वरिष्ठ कृषी तज्ज्ञ,
जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव