प्रतिनिधी/पुणे
निर्धारित वेळेआधी राज्यात दाखल झालेला मान्सून वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. कोकणात दाखल झाल्यानंतर हवामान खात्यासह सर्वांनाच चकवा देत मान्सूनने रविवारी २४ तासात २५० किमीचे अंतर पार करत लातूरपर्यत धडक दिली आहे. रविवार (दि.६ जून) पर्यंत मान्सूनने पुण्यासह मराठवाड्याचाही काही भाग व्यापला असून मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असल्याने पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमी अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
एरवी केरळ ते महाराष्ट्र हा प्रवास करण्यास मान्सूनला आठ दिवस लागतात. परंतु यावेळी हा प्रवास केवळ ४८ तासात पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याने बहुतांशी भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात काही अंशी ऊन व ढगाळ हवामान असल्याने तापमानात चांगलीच घट झाली आहे. राज्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे उन्हाचा चटका कमी होऊ लागला आहे. विदर्भात पारा सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यानंतर तिसऱ्यांदा ४० अंश सेल्सिअसपेक्षा खाली आला आहे. रविवारी विदर्भातील नागपूर येथे ३७.२ अंश सेल्सिअसी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.महाबळेश्वर येथे १६.७ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले.
या जिल्ह्यात मान्सून दाखल
राज्यातील पुणे, अलिबाग,उस्मानाबाद, लातूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर
या जिल्ह्याच्या सीमेवर
सध्या बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, औरंगाबाद, जालना व विदर्भाच्या सीमेवर मान्सून असून दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला असणार आहे