मानव हा निसर्गप्रिय आहे. आपणा सर्वांनाच झाडांचे, फुला-पानाचे खूप आकर्षण असते. आपल्या घराच्या परसात व अंगणात फुला-फळांची झाडे लावणे सर्वांनाच आवडते. मुंबईतील गगनचुंबी इमारतीत राहणारा परिवार असो किंवा खेड्यातील घरात राहणारा परिवार असो प्रत्येकाच्या घरात अथवा घराबाहेर तुम्हाला नक्कीच कुठलेतरी एक तरी रोपटे दिसेलच. मानवाच्या चुकांमुळे पर्यावरणाची हानी होत असली तरी हाच निसर्गप्रिय मानव घरात एकतरी रोपटे लावतोच ही देखील एक जमेची बाजू आहे. याच निसर्गप्रिय स्वभावामुळे शहरातील नर्सरी उद्योगाचा विकास झाला आहे.

काही वर्षांपूर्वी आपल्याकडे शेतकरी शेतात लागणारी रोपे घरीच तयार करत आणि नंतर त्याची लागवड करत. पण बऱ्याच वेळा यामध्ये वेळ, पैसा आणि नियोजन यांच्या अभावामुळे नुकसान होत असे. त्यामुळे नवीन पिढीने वेळ व होणारे नुकसान टाळण्यासाठी रोपवाटिकेत तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण रोपांना प्राधान्य दिले आणि गावालगत भाजीपाला व फळ रोपवाटिकांचा विकास झाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचादेखील विकास झाला.
अॅग्रोवर्ल्डच्या या अंकात तुम्हाला नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणाऱ्या नर्सरीचालकांच्या यशोगाथा वाचायला मिळतील. त्याचबरोबर नर्सरी सुरु करतांना काय काळजी घ्यावी, त्याबाबतच्या कोणत्या योजना आहेत ही सुद्धा माहिती मिळेल. आता उन्हाळा सुरु झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हंगामाला सुरुवात करण्याआधी माती परीक्षण का करावे याचीही महती व माहिती या अंकात दिली असून नक्कीच ती वाचकांना फायदेशीर ठरेल.
आपला नर्सरी विशेषांक आजच बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क : – ९१३००९१६२१ / २२ / २३ / २४ / २५















